
सावंतवाडी : सावंतवाडी शहर भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे माजी शहराध्यक्ष अजय गोंदावळे यांनी भाजपची साथ सोडत शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश पार पडला. ऐन दिवाळीत सेनेन हा मोठा धमाका केलाय.
यावेळी जिल्हाप्रमुख संजू परब म्हणाले, माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर आणि आमदार निलेश राणे यांच्या कार्यप्रेरणेने हा निर्णय घेतला आहे. गोंदावळे यांच्या प्रवेशाने शिवसेनेची ताकद निश्चितच वाढली आहे. त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून शहरात सक्रियपणे काम केले असून त्यांचा जनसंपर्क मोठा आहे. आजचा प्रवेश हा केवळ प्रारंभ आहे. येत्या काही दिवसांत आणखी कार्यकर्ते सेनेत दाखल होणार आहेत. आम्ही निवडणुकीला घाबरत नाही. आमच्याकडे अंगावर घेण्याची ताकद आहे. त्यामुळे कोणाच्याही दबावाला आम्ही घाबरणार नाही. हा प्रवेश म्हणजे एका नेत्यासाठी बड्डे गिफ्ट आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
माजी शहराध्यक्ष अजय गोंदावळे हे बूथ प्रमुखांसह शिवसेनेत डेरेदाखल झालेत. त्यांच्यासह भाजप युवक शहराध्यक्ष राज वरेरकर यांनीही राजीनामा दिलाय. नुकतेच श्री. गोंदावळे हे भाजपच्या व्यासपीठावर उपस्थित होते. परंतु, आता त्यांनी भाजपला रामराम केला आहे. यावेळी शिवसेना नेते अशोक दळवी, शहरप्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, भारती मोरे, परिक्षीत मांजरेकर, विनोद सावंत आदी उपस्थित होते. पक्षांतर्गत कुरघोडीतून त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यांच्या प्रवेशाने शहर भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी हा 'सुरूंग' लावत भाजपला मोठा धक्का दिला असून श्री. गोंदावळे यांच्या या प्रवेशामुळे सावंतवाडी शहरातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच शहर भाजपातील आणखीन काही जण राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.










