
सावंतवाडी : सावंतवाडी शहर भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे माजी शहराध्यक्ष अजय गोंदावळे यांनी भाजपची साथ सोडत शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे. ऐन दिवाळीत सेनेन मोठा धमाका केलाय.
माजी शहराध्यक्ष अजय गोंदावळे हे बूथ प्रमुखांसह शिवसेनेत डेरेदाखल होत आहेत. त्यांच्यासह भाजप युवक शहराध्यक्ष राज वरेरकर यांनीही राजीनामा दिलाय. काही क्षणातच त्यांच्या प्रवेशाची औपचारिकता पूर्ण होणार आहे. नुकतेच गोंदावळे हे भाजपच्या व्यासपीठावर उपस्थित होते. परंतु, आता त्यांनी भाजपला रामराम केला आहे. पक्षांतर्गत कुरघोडीतून त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यांच्या प्रवेशाने शहर भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी हा 'सुरूंग' लावत भाजपला मोठा धक्का दिला आहे. गोंदावळे यांच्या या प्रवेशामुळे सावंतवाडी शहरातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात असून शहर भाजपातील आणखीन काही जण राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.










