
मुंबई : मुंबई येथे नुकतेच मुरारीराव घोरपडे यांच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक पुस्तकाचे प्रकाशन दिमाखात संपन्न झाले. या प्रकाशन सोहळ्यास महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष श्री. राहुल नार्वेकर, राज्यसभेतील खासदार, ज्येष्ठ पत्रकार, लेखक आणि व्याख्याते कुमार केतकर, प्रसिद्ध फिल्म डिरेक्टर ओम प्रकाश मेहरा, ज्येष्ठ संपादक संजय आवटे, सेलिब्रिटी एस्ट्रोलॉजर चिराग दारूवाला तसेच अभिनेत्री मानिनी दे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. पुस्तकाचे लेखक रीता राममूर्ती गुप्ता व इंद्रजीत घोरपडे याही प्रसंगी उपस्थित होते.
या पुस्तकातील सर्वात आकर्षक वैशिष्ट्य म्हणजे सावंतवाडीतील बी.एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट (अप्लाइड आर्ट) चा अंतिम वर्षाचा विद्यार्थी विष्णुप्रसाद संतोष सावंत यांनी काढलेली अप्रतिम चित्रे. या चित्रांचे प्रदर्शन नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, मुंबई येथे सर्वांसाठी खुले आहे. जगभरात प्रकाशित झालेल्या या पुस्तकाबरोबरच, विष्णुप्रसाद यांची चित्रे सर्व नामांकित मान्यवरांनी आवर्जून पाहिली व त्यांचे कौतुक केले. “इतक्या तरुण वयात इतके परिपक्व व ऐतिहासिक दृष्टिकोन असलेले चित्रण पाहणे ही अभिमानाची बाब आहे,” असे उपस्थित मान्यवरांनी मत व्यक्त केले.
सावंतवाडीच्या कला परंपरेला नवे यश मिळवत विष्णुप्रसाद याने आपले नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकावले असून, हा क्षण विद्यार्थी, शिक्षक, तसेच संपूर्ण कोकणासाठी अभिमानाचा आहे. संस्थेचे चेअरमन रमेश भाट, प्राचार्य उदय वेले, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्याचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.










