
सावंतवाडी : सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णसेवेच्या सद्यस्थितीची पाहणी करण्यासाठी सावंतवाडी आणि परिसरातील जागरूक नागरिक ७ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता रुग्णालयाला भेट देणार आहेत. आरोग्य विभागाने उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातील माहिती आणि प्रत्यक्ष रुग्णालयातील सुविधा यांची पडताळणी करणे हा या भेटीचा मुख्य उद्देश आहे.
रुग्णालयातील विस्कळीत रुग्णसेवेसंदर्भात अभिनव फाउंडेशन या संस्थेने कोल्हापूर येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेच्या सुनावणीदरम्यान माननीय उच्च न्यायालयाने रुग्णालयाच्या दुरावस्थेसंदर्भात सत्य पडताळणी समिती नेमण्याचे आदेश दिले आहेत.
आरोग्य विभागातर्फे उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात असे नमूद करण्यात आले आहे की, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात सक्षम अतिदक्षता विभाग (ICU) कार्यरत आहे. याशिवाय, दोन फिजिशियन डॉक्टर दिवसरात्र रुग्णांच्या सेवेत असून, ट्रॉमा केअर युनिट देखील कार्यरत आहे. परिणामी, अपघातग्रस्त आणि तातडीच्या रुग्णांना येथे सेवा उपलब्ध आहे, असा दावा प्रशासनाने केला आहे.
मात्र, या शासकीय दाव्याची सत्यता तपासण्यासाठी आणि रुग्णालयातील प्रत्यक्ष सुविधांचा आढावा घेण्यासाठी स्थानिक नागरिक स्वतः मंगळवारी रुग्णालयात उपस्थित राहणार आहेत. नागरिकांच्या या 'सत्य पडताळणी' भेटीमुळे उपजिल्हा रुग्णालयाच्या कारभारावर आणि उपलब्ध सोयी-सुविधांवर अधिक प्रकाश पडण्याची शक्यता आहे.










