
सावंतवाडी : पोलीस नियमावलीनुसार वरिष्ठांना वेळेत सादर करणे बंधनकारक असलेली आठवडा दैनंदिनी तत्कालीन बांदा पोलीस निरीक्षक बडवे यांनी तब्बल ४० आठवडे उशिराने सादर केल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते जयंत बरेगार यांनी केला आहे. हा शासकीय कर्तव्यचुकीचा प्रकार असून, संबंधित अधिकाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सामाजिक कार्यकर्ते श्री. बरेगार यांनी पोलीस नियमावली भाग तीन, नियम २२९(२) मध्ये नमूद केलेल्या तरतुदीनुसार, पोलीस निरीक्षक आणि मंडळाधिकाऱ्यांनी आठवडा संपल्यानंतरच्या सोमवारी उपविभागीय पोलीस अधिकारी यांना दैनंदिनीची प्रत सादर करणे बंधनकारक आहे. या नियमाची अंमलबजावणी बांदा पोलीस ठाण्यात होत आहे की नाही, हे तपासण्यासाठी श्री. बरेगार यांनी माहितीच्या अधिकाराखाली तत्कालीन पोलीस निरीक्षक बडवे यांनी त्यांच्या कार्यकाळात वरिष्ठ कार्यालयांना पाठवलेल्या शासकीय दैनंदिनीच्या नोंदी असलेल्या रजिस्टरच्या प्रतींची मागणी केली होती. बांदा पोलीस स्टेशनकडून पुरवलेल्या माहितीचे अवलोकन केल्यानंतर श्री. बरेगार यांना धक्कादायक बाब आढळून आली. फेब्रुवारी २०२४ ते जून २०२५ या सतरा महिन्यांच्या कालावधीत तत्कालीन पोलीस निरीक्षक बडवे यांनी ४० आठवडे आपली दैनंदिनी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयास वेळेत सादर केलेली नाही. दैनंदिनी वेळेत सादर न केल्यामुळे या कालावधीतील नोंदी, तपास कार्य दर्शवणे तसेच इतर बाबींमध्ये फेरबदल किंवा दुरुस्ती होण्याची दाट शक्यता श्री. बरेगार यांनी वर्तवली आहे.
त्यांनी बांदा पोलीस स्टेशनकडे तक्रार दाखल करत, तत्कालीन पोलीस निरीक्षक श्री. बडवे यांची कृती ही शासकीय कर्तव्यचुती असल्याचा ठपका ठेवला आहे. त्यांनी प्रभारी अधिकारी, बांदा पोलीस ठाणे यांच्याकडे या प्रकरणी श्री. बडवे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २०८ तसेच कलम १८० नुसार फौजदारी गुन्हा नोंदवावा आणि त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.










