
सावंतवाडी : हिंदू सामर्थ्य जागृत करण्यासाठी आणि तरुणाईला प्रेरणा देण्यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, सिंधुदुर्ग यांच्या वतीने न्हावेली येथे भव्य दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात आले होते. या दौडची सुरुवात पार्सेकर वाडीतून झाली.
माऊली मंदिर, देऊळवाडी, चौकेकरवाडी मार्गे शिस्तबद्ध आणि जल्लोषात ही दौड काढण्यात आली. यावेळी परिसरातील युवक, धारकरी, हिंदुत्ववादी कार्यकर्ते तसेच महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. भगव्या पताकांच्या गजरात, ‘जय दुर्गामाता’, ‘जय शिवराय’च्या घोषणांनी संपूर्ण वातावरण दुमदुमून गेले. महिलांचा उत्स्फूर्त सहभाग आणि तरुणाईची उर्जा यामुळे दौड अधिक आकर्षक आणि भव्य ठरली. या कार्यक्रमासाठी पोलीस प्रशासनाचे विशेष सहकार्य लाभले. वाहतूक व सुरक्षा व्यवस्था सुरळीत ठेवण्यात आली. शिस्तबद्धतेने पार पडलेली ही दौड नागरिकांसाठी आकर्षणाचा विषय ठरली. “अवघे अवघे या… आपले पाऊल लाखमोलाचे !” या घोषणेसह झालेल्या दुर्गामाता दौडीने न्हावेली गावात धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक ऐक्याचा संदेश दिला.










