
सावंतवाडी : मुंबईत होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी सावंतवाडी मतदारसंघातून ५ हजार शिवसैनिक जाणार आहेत. १ तारीखला सायंकाळी आझाद मैदानावरील होणाऱ्या मेळाव्यास रवाना होणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी दिली. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
जिल्हाप्रमुख परब म्हणाले, मतदारसंघातील तालुकाप्रमुख व पदाधिकाऱ्यांची बैठक आज झाली. दरवर्षी मुंबईतील दसरा मेळाव्यासाठी हजारो जण जातात. यावर्षीही ५ हजार शिवसैनिक सावंतवाडी मतदारसंघातून जाण्यासाठीच आमचं नियोजन आहे. यावर्षीचा दसरा मेळावा विशेष असून १ तारीखला सायंकाळी आम्ही रवाना होणार आहोत. यात १७ जिल्हा परिषद व ३ शहरांचा समावेश असणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, मतदारसंघात आमची तयारी पूर्वीपासून आहे. निवडणूक लढण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. आमचे नेते आम. दीपक केसरकर ठरवतील ते आम्हाला मान्य असणार आहे. त्यांच्या मनातील इच्छा आम्ही पूर्ण करू असा विश्वास जिल्हाप्रमुख श्री. परब यांनी व्यक्त केला. यावेळी शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, महिला जिल्हाप्रमुख ॲड. निता सावंत-कविटकर, तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे, दिनेश गावडे, गणेशप्रसाद गवस, नितीन मांजरेकर, प्रेमानंद देसाई, सुनिल डुबळे, खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, भारती मोरे, हर्षद डेरे, अर्चित पोकळे, आबा केसरकर, सुजित कोरगावकर आदी उपस्थित होते.










