
सावंतवाडी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 'सेवा पंधरवड्या'चे औचित्य साधून जिल्ह्यात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून सावंतवाडी तालुक्यात भाजपच्यावतीने जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. ज्याला जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून ७०० हून अधिक स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सावंतवाडी येथील राणी पार्वती देवी हायस्कूलमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धकांनी आपल्या कुंचल्याच्या माध्यमातून 'आत्मनिर्भर भारत', 'विकसित भारत', आणि 'डिजिटल भारत' हे विषय रेखाटले. अनेक युवा कलाकारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही पोर्ट्रेट चितारले. या स्पर्धेचे चार गटांमध्ये विभाजन करण्यात आले होते. प्रथम गट: इयत्ता पहिली ते पाचवी (रंगभरण स्पर्धा), द्वितीय गट: इयत्ता सहावी ते दहावी, तृतीय गट: इयत्ता अकरावी, खुल्या गट (सर्व वयोगटांसाठी) ही होती.
विकसित भारताची नांदी या स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी बोलताना प्रभाकर सावंत यांनी स्पर्धकांचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले, शालेय विद्यार्थी आणि खुल्या गटातील विविध कलाकारांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत भाग घेतला, हीच खऱ्या अर्थाने विकसित भारताची नांदी आहे. यावेळी जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन तथा भाजपचे प्रदेश सदस्य अतुल काळसेकर यांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप गावडे, युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखम सावंत भोसले, जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, जिल्हा चिटणीस मनोज नाईक, जिल्हा सहकार समन्वयक रवींद्र मडगावकर, शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडीवरेकर, मंडल अध्यक्ष संतोष राऊळ, तसेच स्वागत नाटेकर, आनंद नेवगी, संजू शिरोडकर, दिलीप भालेकर, राजू बेग, मिसबा शेख, दादा मडकाईकर यांच्यासह कलाशिक्षक बी.व्ही. मालवणकर, राठोड, गाभित, शिक्षिका अर्चना सावंत, साळगावकर, रेवती टोपले, फाईन आर्टचे प्राध्यापक बी. एस. बांदेकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मालवणी कवी दादा मडकईकर आणि भाजपच्या सावंतवाडी महिला मंडळाच्या पदाधिकारी मिसबा शेख यांचा सत्कार करण्यात आला. स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र मडगावकर यांनी केले.










