वैकुंठ रथ आणणे इतके सोपं काम नाही : लक्ष्मण कदम

Edited by: विनायक गांवस
Published on: September 28, 2025 17:31 PM
views 238  views

सावंतवाडी : रवी जाधव हे हाडाचे सामाजिक कार्यकर्ते आहे. ते मोठ्या परिश्रमाने उच्च शिक्षण घेऊन बीए बीएड, एम ए, एम फिल फर्स्ट क्लासमध्ये पास झाले आहेत. त्यांची शैक्षणिक व सामाजिक पात्रता सावंतवाडीच्या जनतेला माहित आहे. ज्या परिस्थितीतून ते आले त्या परिस्थितीची त्यांना जाणीव आहे. त्यामुळे ते संकटात असलेल्या लोकांना रात्रंदिवस मदत करतात. या गोष्टीचा पहिला अभ्यास करा नंतरच त्यांच्यावर बोला. वैकुंठ रथ आणणे गोव्यातून दारू आणण्याऐवढ सोपं नाही असा टोला सामाजिक बांधिलकीचे लक्ष्मण कदम यांनी हाणला.

रवी जाधव यांनी फक्त मानवी जीवनाशी निगडित असलेल्या विषयावर आवाज उठवला. आपण यावर काहीच न बोलता भंकस बाता करत आहात.  शहर व आजूबाजूच्या गावासाठी तुमचं सामाजिक योगदान काय ? हे सर्वप्रथम दाखवा आणि मगच बोला. अजून तुम्ही खूप लहान आहात. उगाच आमच्या सामाजिक कामात ढवळाढवळ करू नका. कोरोनाच्या महामारी मध्ये तुमच्या नेत्यांनी रवी जाधव यांचा व्यवसाय उध्वस्त करून त्याला व त्याच्या कुटुंबाला ७ दिवस रस्त्यावर आणून किती त्रास दिला होता हे पण सावंतवाडीच्या जनतेने पाहिलं आहे. जनतेच्या आशीर्वादानेच रवी जाधव  सावरू शकले. आज ते पुन्हा एकदा स्वतःच्या पायावर उभे राहिले. अजूनही रस्त्यावर बसून सणासुदीच्या वस्तू विक्री करून त्या कष्टाच्या मिळालेल्या पैशातून प्रामाणिकपणे सामाजिक कार्य करत आहेत. त्यांच्या कामाची पद्धत आम्ही जवळून पाहिली आहे. म्हणूनच आम्ही त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून प्रसंगी रात्रंदिवस जनसेवा करत आहोत. फक्त चार दिवस तुम्ही आमच्या सोबत काम करून दाखवा म्हणजे कळेल समाजसेवा काय असते. उगाच कुणाची सुपारी घेऊन रवी जाधव यांच्या कार्यावर बोट ठेवून त्यांच्या सामाजिक कार्याचा अपमान करू नका, तुम्ही कोणाबद्दल बोलतात याचं जरा भान ठेवा. अन्यथा, तुमचे काय धंदे आहेत ते जनतेसमोर आणू आणि तुम्ही त्यांच्याकडे जो हिशोब मागत आहात त्या अगोदर त्यांचा मागचा हिशोब तुम्ही स्वतः देणे लागतात तो हिशोब अगोदर क्लिअर करा, मगच त्यांच्या हिशोबावर बोला.

 आमदार दीपक केसरकर यांचे आम्ही तुमच्या अगोदर पासूनच शुभचिंतक आहोत. त्यांच्या प्रत्येक चांगल्या कामाची आम्ही नेहमी स्तुती करतो‌. परंतु जेथे चुकीचं वाटतं तेथे आम्हाला आवाज उठवावाच  लागणार आहे. कारण, हा आमच्या सर्वसामान्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. तो अधिकार आम्हाला संविधानाने दिला आहे. राहिला विषय सहा दिवसाच्या मिनी महोत्सवाचा स्टेज, बैठक व्यवस्था, लाईट व साऊंड याचा खर्च दीपक केसरकर यांनी केला होता. तर सहा दिवसा करिता स्टॉल बांधणी खर्च, चार दिवसाच्या कार्यक्रम खर्च, डिजिटल स्क्रीन भाडे,तसेच प्रत्येक दिवसाचे रोख रक्कम बक्षीस वितरणासाठी लागणारा सर्व खर्च पदर मोड करून आम्ही स्वतः केला. तसेच दीपकभाई केसरकर मित्रमंडळाच्या जुन्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने मोठ्या थाटा माटात सहा दिवस मिनी महोत्सव साजरा करून शहरातील जनतेला व स्टॉल धारकांना आनंद दिला होता त्यावेळी केसरकर यांनी देखील आमचे कौतुक केले होते. त्यानी आम्हाला केलेली मदत ही जनतेसाठीच होती त्याचा आताच्या युवा नेत्यांनी वर्म काढू नये. त्यावेळी आपण या सिस्टीम मध्ये नव्हतात. दरम्यान, वैकुंठ  रथच काय तर ॲम्बुलन्स पण आम्ही लवकर आणणार आणि ती ही आमच्या गोरगरिब रुग्णांसाठी 24 तास मोफत असणार हा रवी जाधव यांचा संकल्प आहे. आम्ही स्व कष्टाने व स्व हिमतीने सामाजिक कार्य करतो, याही पुढे करत राहणार. आम्हा सर्वसामान्य जनतेला होत असलेल्या त्रासावर आम्ही बोट ठेवतो. तुमच्या कुठच्याही नेत्यांची विनाकारण बदनामी करण्याची आम्हाला मुळीच इच्छा नाही. तुम्हाला दुखत असेल तर त्याच्यावर आमच्याकडे मुळीच इलाज नाही. याही पुढे या शहरात चुकीच्या गोष्टी  होत असतील तर त्याच्यावर आम्ही बोट ठेवणारच. तुम्ही वाटेल तेवढं तोंड उघडा, आरोप करा आम्ही तुमच्या तोंडात मावणारे नाही. रवी जाधव यांचा व्यवसाय व सामाजिक काम हे एक नंबरच पारदर्शक आणि जनहिताचे आहे. याची रोज पोच पावती त्याला जनतेकडून मिळते याचा त्यांना समाधान व आनंद आहे.

याही पुढे आमच्या न्याया हक्कासाठी आम्ही लढतच राहणार आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा आम्हाला लाभलेला आहे असं ते म्हणाले.