जिल्हा ग्रंथालय संघाची अद्ययावत वेबसाइट बनणार

Edited by: विनायक गांवस
Published on: September 28, 2025 17:23 PM
views 85  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रंथालय चळवळ आता तंत्रज्ञानाच्या मदतीने अधिक व्यापक आणि सुलभ होणार आहे. जिल्ह्यातील सर्वच्या सर्व १२८ ग्रंथालये एकमेकांशी जोडण्यासाठी जिल्हा ग्रंथालय संघाची नवीन अद्ययावत वेबसाइट तयार करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे गावागावातील ग्रंथालयांना एकमेकांशी संपर्क साधणे आणि माहितीची देवाणघेवाण करणे शक्य होणार आहे. हा महत्त्वपूर्ण निर्णय सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. 

रावबहादूर अनंत शिवाजी देसाई वाचनालय ग्रंथालय सभागृहात जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. श्री. मस्के यांनी स्पष्ट केले की, येत्या वर्षभरात सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ नव्या तंत्रज्ञानानुसार अद्ययावत वेबसाइट तयार करेल. या माध्यमातून संघाचे सर्व उपक्रम आणि ग्रंथालय चळवळीविषयीची माहिती सर्व ग्रंथालये आणि सदस्यांपर्यंत त्वरित पोहोचवली जाईल. यापूर्वी माजी जिल्हाध्यक्ष अनंत वैद्य यांनी ग्रंथालय चळवळ व्यापक करण्यासाठी बाल साहित्यिक निर्माण करण्याची गरज व्यक्त केली होती, तसेच तंत्रज्ञानानुसार वेबसाइट तयार करण्याची सूचना केली होती.

यावेळी जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने जिल्ह्यात नावलौकिक मिळवलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रसिद्ध मालवणी कवी रू. जा. रि. ओ. पिटो यांना 'राजधानी कवी पुरस्कार' मिळाल्याबद्दल, संजय शिंदे यांना राज्य ग्रंथालय संघाचा 'ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार' मिळाल्याबद्दल, माजी जिल्हाध्यक्ष अनंत वैद्य यांची कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मंडळावर निवड झाल्याबद्दल यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच जिल्हा ग्रंथालयाचे सचिव राजन पांचाळ यांनी या वर्षापासून जिल्हा ग्रंथालय संघाच्या सभासद वर्गणीत बदल करण्यात आल्याची माहिती दिली. 'अ' वर्ग ग्रंथालय: ₹२५०, 'ब' वर्ग ग्रंथालय: ₹२००, 'क' वर्ग ग्रंथालय: ₹१५०, 'ड' वर्ग ग्रंथालय: ₹१००, व्यक्ती सभासद: ₹५००,कर्मचारी सभासद: ₹५० अशी राहणार आहे‌.

ग्रंथालय चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी आदर्शवत ग्रंथालय आणि कर्मचारी यांचा गौरव करण्यासाठी एक समिती गठीत करून पुरस्कार वितरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. भाजपचे जिल्हाध्यक्ष साहित्यिक प्रभाकर सावंत यांनी ग्रंथालय संघाला २१,००० ची देणगी दिल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव संमत करण्यात आला.

जिल्हा ग्रंथालय संघाचे अधिवेशन जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मालवण-तारकर्ली येथे घेण्याबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीस जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक धाकू तानावडे, ॲड. संतोष सावंत, सतीश गावडे, प्रसाद दळवी, विजय भोगटे, सौ. दिपाली काजरेकर, विजया पाटकर, निलेश तळेकर, रमाकांत केरकर, जयेंद्र तळेकर, सीताराम परब, केदार सामंत, विजय सावंत, गुरुनाथ पावरे आदी सदस्य उपस्थित होते. समारोपावेळी श्री. तानावडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.