
सावंतवाडी : भाजपातून काल रात्री राजीनामा दिलेले शक्ती केंद्रप्रमुख देवानंद खवणेकर यांनी आज सकाळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या उपस्थितीत हाती धनुष्य घेतला आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या उपस्थितीत त्यांनी सेनेत पक्षप्रवेश केला आहे. आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला हा धक्का मानला जात आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीत असणाऱ्या भाजप व शिवसेना यांच्यात धुसफूस सुरू असल्याची चर्चा आहे. प्रमुख नेत्यांची वक्तव्य यावर शिक्कामोर्तब करत असून भाजपच्या शक्तीकेंद्र प्रमुखाने काल रात्री पदाचा व सदस्यत्वाचा राजीनामा देत आज सकाळी शिवसेनेत प्रवेश केला आहे. नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूकांच्या हालचाली सुरू झाल्या असतानाच आज शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या नेतृत्वाखाली आरोंदा येथील ग्रामस्थांसह त्यांनी सेनेत प्रवेश केला.
यावेळी परब यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यापुढे गावात शिवसेना पक्ष वाढविण्यासाठी काम करू असा विश्वास श्री. खवणेकर यांनी व्यक्त केला. यावेळी देवानंद खवणेकर यांसह गजानन कुबल, जगन्नाथ मोटे, कार्तिक नाईक, विठोबा ताटकर,साईराज नाईक, आदींनी जाहीर पक्षप्रवेश केला. याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे, परिक्षीत मांजरेकर आदी उपस्थित होते. भाजपला हा धक्का मानला जात असून जिल्ह्याच्या राजकारणात याचे पडसाद उमटताना बघायला मिळणार आहेत. तर अनेक जण शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे देखील बोलले जात आहे.










