
सावंतवाडी : सामाजिक बांधिलकीचा राजकारणाशी संबंध नाही म्हणून सांगणाऱ्या रवी जाधव यांनी राजकारणात पडू नये, राज्याचे शिक्षणमंत्री म्हणून काम केलेल्या व चौथ्यांचा आमदार असणाऱ्या दीपक केसरकर यांच्यावर टीका करण्याची तुमची पात्रता नाही. त्यामुळे केसरकर यांच्यावर बोलताना श्री. जाधव यांनी भान ठेवून बोलाव. अन्यथा, युवासेना स्टाईलने उत्तर दिले जाईल याची नोंद घ्यावी, असे आवाहन युवासेना शहरप्रमुख निखिल सावंत यांनी केले आहे. आम. केसरकर यांच्यावर केलेल्या टीकेला त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे उत्तर दिले आहे.
रवी जाधव हे सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांचे सामाजिक क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय आहे. त्यामुळे त्यांनी राजकाण करू नये असे आवाहन यापूर्वी केले होते. मात्र, कुणाची तरी सुपारी घेऊन दीपक केसरकरांवर ते नाहक टिका करत आहेत. प्रसिद्धीचे व्यसन लागलेल्या रवी जाधव यांची केसरकर यांच्यावर बोलण्याची पात्रता नाही. त्यांनी विनाकारण राजकारणात पडू नये. दीपक केसरकर राज्याचे मंत्री, चार वेळा आमदार राहीलेले व्यक्तिमत्त्व आहे. सामाजिक भान, जनतेच्या समस्या त्यांना ठावूक आहेत. सावंतवाडी गार्डन मधील मिनीमहोत्सवामध्ये रवी जाधव यांना तो दिसला असेलच. त्यामुळे विनाकारण टीका न करता स्टॉल भाडेमधून मिळालेल्या उत्पन्नातून तुम्ही केलेल्या शववाहिनीच्या (वैकुंठ रथ) घोषणेचे काय झाले ? याचे आत्मचिंतन करावे. दीपक केसरकर यांच्यावर बोलताना तोंड सांभाळून बोलावे. अन्यथा, आम्हाला तोंड उघडावे लागेल. झाकली मूठ सव्वा लाखाचीच राहूदेत असे श्री. सावंत यांनी सांगितले आहे.










