ओंकार हत्ती मडूरा - सातोसे रेखवाडीत...?

वनविभागाची धांदल | हत्तीला पाहण्यासाठी स्थानिकांची गर्दी
Edited by:
Published on: September 27, 2025 17:34 PM
views 448  views

बांदा : मडूरा - सातोसे सीमेवर रेखवाडी येथे ओंकार हत्ती आज दुपारी दाखल झाला. त्यामुळे सिंधुदुर्ग वनविभागाची मात्र एकच धांदल उडाली. सातोसे रेखवाडी येथे ओंकार हत्ती चक्क स्थानिकांच्या अंगणात दाखल झाला. भर वस्तीमधील पाणंदीमध्ये तो बिनधास्तपणे फिरत होता. ओंकारची छबी मोबाईल मध्ये टिपण्यासाठी युवा वर्गाची झुंबड उडाली होती. मात्र वनविभागाचे कर्मचारी हत्तीपासून लांब राहण्याचे आवाहन नागरिकांना करत होते. या भागात ओंकार हत्तीने भातशेतीची नासधूस केली. वनविभागाच्या जलद कृती दलाचे प्रमुख बबन रेडकर यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाचे कर्मचारी ओंकारला नागरी वस्तीपासून दूर नेण्याचे प्रयत्न करत आहेत.

तांबोसे - उगवे भागातून तेरेखोल नदीतून ओंकारने सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश केला. दुपारच्या सत्रात तो सातोसे रेखवाडी येथील राजन वर्दम यांच्या घरा नजीक दाखल झाला. हत्ती गावात आल्याची बातमी पंचक्रोशीत वाऱ्यासारखी पसरली. हत्ती चक्क भरवस्तीतील पाणंदीमध्ये फिरत होता. यावेळी त्यांनी भातशेती व भाजीपाला शेतीची नासधूस केली. हत्ती पुन्हा गोव्यात येऊ नये यासाठी वन विभागाचे कर्मचारी तेरेखोल नदीच्या पलीकडे मोठ्या प्रमाणात ॲटमबॉम्ब फोडत आहेत.