'सामाजिक बांधिलकी'चा राजकारणाशी संबंध नाही : रवी जाधव

Edited by: विनायक गांवस
Published on: September 27, 2025 17:10 PM
views 118  views

सावंतवाडी : रस्त्यांवरील खड्डे व समस्यांना 'लहान-लहान गोष्टी' म्हणणाऱ्या माजी शिक्षणमंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्यावर सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांनी टीका केली आहे. हवेतून प्रवास करणाऱ्यांना रस्त्यावरील गोष्टी लहानच दिसणार,' असा टोला लगावत सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचा निवडणूक अथवा राजकारणाशी काडीमात्र संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

केसरकर यांनी पत्रकार परिषदेत, निवडणूका जवळ आल्यावर काही लोक रस्त्यावर घडणाऱ्या लहान लहान गोष्टी मोठ्या असल्यासारख्या करून दाखवतात,' असे विधान केले होते. या विधानाचा समाचार घेताना श्री. जाधव म्हणाले, खड्ड्यांमुळे अपघात होऊन मृत्यूच्या घटना घडत असून ज्या कुटुंबावर हा प्रसंग कोसळतो, त्यांच्यासाठी हे दुःख पचवणे फार मोठी गोष्ट असते. श्री. केसरकर यांनी कोणाच्या सांगण्यावर विश्वास न ठेवता रस्त्यांची अवस्था बघून प्रशासनाला कार्यवाहीचे आदेश द्यावेत. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेकडून रस्त्यांवरील खड्डे स्वखर्चाने बुजवण्याचे काम केले जाते. जे काम प्रशासन आणि नेत्यांनी करायला पाहिजे, ते आमची संस्था करते. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघातग्रस्तांना मदत करणारी आमची संस्था त्यांच्या वेदना समजू शकते. दुर्दैवाने, आमच्या या कामाला 'राजकारण' म्हणतात याच शल्य असून याला आम्ही तुम्ही दिलेली शाबासकीच समजतो," असे जाधव म्हणाले. तसेच या संस्थेचा निवडणूक किंवा राजकारणाशी काडीमात्र संबंध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 'जीवनरक्षण अभियान' अंतर्गत ३० सप्टेंबरला राबवण्यात येणाऱ्या खड्डे बुजवा अभियानात सामील होण्याचे आवाहन त्यांनी केले.