कामळेवीर इथं दिवसाढवळ्या घरफोडी

Edited by: विनायक गांवस
Published on: September 26, 2025 19:33 PM
views 193  views

सावंतवाडी : कामळेवीर येथे दिवसाढवळ्या घरफोडीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी सकाळी गिरीश आळवे यांच्या बंद घराला लक्ष्य करत अज्ञात चोरट्यांनी ही चोरी केली. चोरट्यांनी घरातून रोख रक्कम, एक कॅमेरा आणि अन्य काही वस्तू लंपास केल्या आहेत.

कामळेवीर येथील रहिवासी गिरीश आळवे हे नेहमीप्रमाणे सकाळी आपले घर बंद करून माणगाव येथील त्यांच्या फोटो स्टुडिओवर जाण्यासाठी बाहेर पडले होते. आळवे घराबाहेर पडल्याची संधी साधत, अज्ञात चोरट्यांनी सकाळी साडेअकराच्या सुमारास त्यांचे घर फोडले. चोरट्यांनी सुरुवातीला घराच्या मागील बाजूचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना त्यात यश आले नाही. त्यानंतर, त्यांनी घराच्या पुढील दरवाजाचे कडी-बॅकेट उघडून घरात प्रवेश केला. आतमध्ये शिरल्यावर चोरट्यांनी घरातील दोन्ही कपाटे फोडून त्यातील मौल्यवान ऐवज चोरला. या घटनेची माहिती घरमालक गिरीश आळवे यांनी तत्काळ वेंगुर्ला १०० या हेल्पलाईनवर दिली आहे. तसेच, त्यांनी गावातील पोलीस पाटील यांनाही या चोरीबद्दल कळवले आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या घरफोडीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी तातडीने तपास सुरू करावा आणि चोरट्यांना अटक करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.