
सावंतवाडी : सावंतवाडी-बेळगाव या राज्य महामार्गावर सावंतवाडी कचरा डेपोच्या अलिकडे रस्त्याला मोठे भगदाड पडले आहे. रस्त्याच्या बरोबर मध्यभागी आणि वळणावरच हे भगदाड असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रवाशांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने याची तात्काळ दखल घेऊन दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.
रात्रीच्या वेळी किंवा अचानक येणाऱ्या वाहनांमुळे वळणावर असलेल्या या भगदाडाचा अंदाज न आल्यास अपघात होऊ शकतो. दुचाकी, चारचाकी गाड्या चालवणाऱ्यांसाठी हा खड्डा धोकादायक ठरत आहे.या रस्त्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. स्थानिक प्रवाशांनी या गंभीर समस्येकडे लक्ष वेधले असून मोठा अपघात होण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने या भगदाडाची त्वरित डागडुजी करावी अशी मागणी केली आहे.










