
सावंतवाडी : येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या लक्ष्मी बरागडे या महिलेस तातडीने A निगेटिव्ह रक्ताची गरज होती. ही माहिती मिळताच, ‘युवा रक्तदाता संघटना, सावंतवाडी’ने मदतीसाठी पुढाकार घेतला. छायाचित्रकार सूरज मठकर यांनी रक्तदान करत जीवदान दिले.
गरजू रुग्णाला वेळेत रक्त उपलब्ध करून जीवनदान देत सूरज मठकर यांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांनी सावंतवाडीहून थेट जिल्हा रुग्णालय ओरोस येथील रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान केले. त्यांच्या या तत्परतेमुळे आणि सामाजिक जाणीवेमुळे रुग्णाला वेळीच आवश्यक रक्त मिळाले. या संपूर्ण प्रक्रियेत ‘युवा रक्तदाता संघटने’चे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी विशेष परिश्रम घेतले. रुग्णांच्या नातेवाईकांनी श्री. मठकर यांच्यासह युवा रक्तदाता संघटनेचे आभार मानले.










