
सावंतवाडी : मुंबई येथे होणाऱ्या टाटा अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेसाठी पात्र ठरलेला सावंतवाडी येथील शांतिनिकेतन इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी कबीर हेरेकर याने आपल्या धावण्याच्या आवडीतून केवळ स्वतःपुरता मर्यादित न राहता आपल्या मित्रांनाही मोबाईलच्या दुनियेतून बाहेर काढून मैदानी खेळाकडे आकर्षित केले आहे.
गोव्यातील बिचोलिम येथे भारतीय जनता युवा मोर्चाने 'व्यसनमुक्त भारत' या उद्देशाने आयोजित केलेल्या 'नमो युवा मॅरेथॉन' स्पर्धेत कबीरच्या नेतृत्वाखाली एकूण १७ धावकांनी सहभाग घेतला. या सर्व धावकांनी ५ किलोमीटरचे अंतर यशस्वीरित्या पूर्ण केले. या १७ धावकांमध्ये ७ वर्षांच्या मुलांपासून ते ४७ वर्षांच्या प्रौढांचा समावेश होता, ज्यात काही पालकांनीही उत्साहाने भाग घेतला. विशेष म्हणजे, ही कबीर हेरेकरची ४२वी मॅरेथॉन स्पर्धा होती.एक लहानसा प्रयत्न किती मोठा बदल घडवून आणू शकतो, याचे उत्तम उदाहरण कबीरने घालून दिले आहे. त्याच्या प्रेरणेने आज अनेक तरुण मोबाइल सोडून आरोग्यासाठी मैदानी खेळांना प्राधान्य देत आहेत.










