
सावंतवाडी : ज्येष्ठ साहित्यिक सुरेश शामराव ठाकूर, अध्यक्ष कोमसाप मालवण यांनी संपादीत केलेल्या व कोमसाप मालवणच्या १८ ललित लेखकांनी साकारलेल्या 'बिज अंकुरे अंकुरे' या पुस्तकाला कोमसापचा संपादनाचा पहिला पुरस्कार नुकताच जाहीर झालेला आहे. या पुरस्काराचे वितरण ८ नोव्हेंबर २०२५ रोजी रत्नागिरी येथील कवितेची राजधानी मालगुंड येथे सन्मानपूर्वक होणार आहे.
या पुस्तकात कोमसाप मालवणच्या अनुक्रमे रश्मी रामचंद्र आंगणे, वर्षाराणी बलवंत अभ्यंकर, पूर्वा मनोज खाडीलकर, तेजल गुरुनाथ ताम्हणकर, ऋतुजा राजेंद्र केळकर, आदिती धोंडी मसूरकर, शिवराज विठ्ठल सावंत, मधुरा महेश माणगावकर, रसिका राजेंद्र तेंडोलकर, दिव्या दीपक परब, वंदना नारायण राणे, देवयानी त्रिंबक आजगावकर, विठ्ठल लक्ष्मण लाकम, वैजयंती विद्याधर करंदीकर, नारायण यशवंत धुरी, सदानंद मनोहर कांबळी, अशोक कांबळी, गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर या १८ लेखकांनी आपले १४६ ललित लेख साकारले असून सदर पुस्तक 'सत्त्वश्री प्रकाशन रत्नागिरी' यांनी प्रकाशित केलेले आहे. या पुस्तकाला ज्येष्ठ लेखक रविंद्र वराडकर यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना लाभलेली असून प्रस्तावनेत सदर पुस्तकाचा गौरव करताना ते म्हणतात, "१८ लेखकांच्या प्रतिभेचे नवोन्मेष साकारलेले हे १४६ ललित लेखांचे महाराष्ट्रातले पहिले पुस्तक आहे." सदर पुस्तकाला आशीर्वाद देताना पद्मश्री मधु मंगेश कर्णिक म्हणतात, "सुरेश ठाकूर आणि संपादित केलेला हा ग्रंथ म्हणजे केवळ कोकणातच नव्हे तर महाराष्ट्राला अनुकरणीय ठरावा असाच आहे. मालवण कोमसाप शाखेच्या या उपक्रमाचे मी मनापासून कौतुक करतो."
या पुरस्काराबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना सुरेश ठाकूर म्हणाले, "गेली सहा वर्षे अध्यक्ष म्हणून काम करत असताना मी सिंधुसाहित्यसरिता (चरित्र ग्रंथ), बीज अंकुरे अंकुरे (ललित लेख संग्रह), ये गं ये गं सरी (कविता संग्रह) या तीन पुस्तकांच्या माध्यमातून कोमसापच्या जवळ जवळ १०० लेखकांना मी लिहिते केले. यातच मला आनंद आहे. आज बीज अंकुरे अंकुरेचे जे कौतुक झाले, ते माझे स्वतःचे नसून कोमसाप मालवणच्या लेखक सदस्यांचे आहे. मी मात्र संपादक म्हणून निमित्त मात्र आहे. पुरस्कार जाहीर झाल्यामुळे कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवणच्या सर्व सदस्यांमध्ये नवचैतन्य पसरले आहेत.










