
सावंतवाडी : कोकण मराठी साहित्य परिषदेने (कोमसाप) सन २०२३-२४ साठीचे वाङ्मयीन आणि वाङ्मयेतर पुरस्कार नुकतेच जाहीर केले आहेत. हे पुरस्कार कोमसापच्यावतीने कुडाळ येथे झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जाहीर करण्यात आले. या पुरस्कारांमध्ये साहित्य आणि समाजसेवा या दोन्ही क्षेत्रांतील योगदानाचा गौरव करण्यात आला आहे.
प्रमुख वाङ्मयीन पुरस्कारांचे विजेते कादंबरी: प्रथम क्रमांकाचा र. वा. दिघे स्मृती पुरस्कार उदय जोशी यांच्या अर्धकौरव आणि द्वितीय क्रमांकाचा वि. वा. हडप स्मृती पुरस्कार बाळासाहेब लबडे यांच्या चिंबोरे युद्ध यांना मिळाला आहे.
कथा: प्रथम क्रमांकाचा वि. सी. गुर्जर स्मृती पुरस्कार शशिकांत काळे यांच्या कालयंत्र आणि द्वितीय क्रमांकाचा विद्याधर भागवत स्मृती पुरस्कार वीणा रारावीकर यांच्या गुजगोष्टी ग शब्दांच्या कथासंग्रहाला जाहीर झाला आहे.
कविता: प्रथम क्रमांकाचा आरती प्रभू स्मृती पुरस्कार गीतेश शिंदे यांच्या सीसीटीव्हीच्या गर्द छायेत आणि द्वितीय क्रमांकाचा वसंत सावंत स्मृती पुरस्कार मानसी चाफेकर यांच्या हळुवार मनाची आई या कवितासंग्रहाला प्रदान करण्यात आला आहे.
आत्मचरित्र: धनंजय कीर स्मृती पुरस्कार अरुण घाडीगावकर यांच्या भक्ती पंथेची जावे या संग्रहास मिळाला.
चरित्र: डॉ. राजू शनवार यांच्या पोश्यांपार या चरित्राला श्रीकांत शेट्ये स्मृती पुरस्कार मिळाला.
समीक्षा: प्रभाकर पाध्ये स्मृती पुरस्कार रोहिदास पोटे यांच्या गझल गंधाक्षरी या ग्रंथाला जाहीर झाला.
नाटक: भाई भगत पुरस्कार प्रकाश चांदे यांच्या तराने अपसाने या नाटकास प्रदान करण्यात आला आहे.
ललित गद्य: प्रथम क्रमांकाचा अनंत काणेकर स्मृती पुरस्कार वैशाली पंडित यांच्या मंत्रभुल या ललित ग्रंथास, तर द्वितीय क्रमांकाचा सौ. लक्ष्मीबाई व माजी न्यायमूर्ती राजाभाऊ गवांदे पुरस्कार डॉ. अजित मगदूम यांच्या न घेतलेला रस्ता या साहित्यकृतीस मिळाला आहे.
बालवाङ्मय: प्र. श्री. नेरुरकर स्मृती पुरस्कार सदानंद पुंडपाळ यांच्या हिरवी राने, गाती गाणे या ग्रंथास मिळाला.
संकीर्ण: प्रथम क्रमांकाचा वि. कृ. नेरुरकर स्मृती पुरस्कार रिचर्ड नुनीस यांच्या वाडवळी शब्द कोष आणि व्युत्पत्ती आणि द्वितीय क्रमांकाचा अरुण आठल्ये स्मृती पुरस्कार पराडकर यांच्या अक्षरयात्रा या ग्रंथाला जाहीर झाला.
वैचारिक: फादर स्टीफन सुवार्ता पुरस्कार ना. वा. रणशिंग यांच्या आदिवासी ते पांढरपेशी या ग्रंथाला मिळाला आहे.
नाटक-एकांकिका: रमेश कीर पुरस्कार डॉ. सुभाष कटकदौंड यांच्या नव्याने जगायचंय मला या ग्रंथास मिळाला.
याव्यतिरिक्त, कोमसापचे विशेष पुरस्कार सुरेश ठाकूर (बीज अंकुरे अंकुरे), विलास गावडे (पटावरच्या सोंगट्या) आणि अविनाश कोल्हे (वाळूचे किल्ले) यांना अनुक्रमे संपादन, कथासंग्रह आणि कादंबरी या विभागांसाठी जाहीर झाले आहेत. कोकण मराठी साहित्य परिषदेने साहित्य क्षेत्राबाहेरील कार्याचा गौरव करण्यासाठीही काही विशेष पुरस्कार जाहीर केले आहेत. कविता राजधानी पुरस्कार - मालवणचे कोकणी कवी रुजारिओ पिंटो.
कोकण साहित्यभूषण - डहाणूचे प्रवीण नारायण दवणे.
कै. पद्मश्री भाऊसाहेब वर्तक प्रतिष्ठान पुरस्कार - माजी शिक्षणाधिकारी, साहित्यिक डॉ. जिवबा केळुस्कर.
श्री. बा. कारखानीस पुरस्कार - ज्येष्ठ साहित्यिक, लेखक डॉ. तानाजीराव चोरगे.
गुरुवर्य अ. आ. देसाई कोमसाप कार्यकर्ता पुरस्कार - मुंबई बोरिवली शाखेचे जगदीश भोवड. राजा राजवाडे स्मृती वाङ्मयीन कार्यकर्ती पुरस्कार - ठाण्याच्या नितल वढावकर.
सौ. नमिता कीर लक्षवेधी पुरस्कार - रत्नागिरीच्या उज्जवला प्रभाकर बापट.
वामनराव दाते स्मृती उत्कृष्ट कोमसाप शाखा पुरस्कार - पालघर जिल्ह्यातील पालघर शाखा. सुलोचना मुरारी नार्वेकर स्मृती पुरस्कार - लांजाच्या तनुजा संतोष प्रभूदेसाई.
कवी उमाकांत कीर स्मृती काव्य पुरस्कार - मालगुंडचे अरुण तुकाराम मोर्ये.
कोमसाप युवा कार्यकर्ता पुरस्कार - ठाण्याच्या दीपा ठाणेकर. या पुरस्कार विजेत्यांना लवकरच रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरवण्यात येईल, अशी माहिती कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्षा सौ. नमिता किर आणि कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ यांनी दिली आहे.










