
सावंतवाडी : सावंतवाडीतील वेंगुर्ला बसस्थानकाची अवस्था खड्ड्यांमुळे बिकट झाली आहे. बसस्थानकाच्या आत जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरच भला मोठा खड्डा पडला आहे. यामुळे प्रवाशांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या खड्ड्यांमुळे बसमधील प्रवाशांना धक्के बसत असून अनेकांना इजा होण्याचा धोका निर्माण झाला आहे. ही गंभीर समस्या समोर आल्यानंतर, संतप्त झालेले नागरिक रवी जाधव यांनी या परिस्थितीला एसटी महामंडळ जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. 'प्रवाशांना सेवा देता की त्यांना जखमी करता?', असा संतप्त सवाल त्यांनी प्रशासनाला विचारला आहे.
जाधव यांनी सांगितले की, नुकत्याच घडलेल्या एका घटनेत, बसच्या मागच्या सीटवर बसलेल्या एका प्रवाशाला खड्ड्यामुळे मोठा धक्का बसला. याच मार्गावरून दररोज असंख्य शालेय विद्यार्थी, नागरिक आणि ज्येष्ठ नागरिक प्रवास करतात. जर वेळीच या समस्येवर लक्ष दिले नाही, तर भविष्यात मोठा अपघात होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. या गंभीर समस्येकडे एसटी महामंडळाचे लक्ष वेधण्यासाठी रवी जाधव यांनी प्रशासनाला दोन दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. जर दोन दिवसांत हा खड्डा बुजवला गेला नाही, तर त्याच खड्ड्यात बसून आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.










