
सावंतवाडी : शहरातील गवळी तिठा परिसरात असलेल्या रत्नाकर माळी यांच्या श्रीकृष्ण प्रेसची व शुभम गवळी यांच्या घराच्या भिंतीसह सार्वजनिक विहीर अतिवृष्टीमुळे कोसळल्याची घटना आज सकाळी घडली. याबाबतची माहिती माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिली.
साळगावकर यांनी घटनास्थळी जाऊन वस्तुस्थितीची पाहणी केली. या घटनेमध्ये जवळपास सात ते आठ लाखाचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. सावंतवाडी तालुक्यांमध्ये सध्या अधून मधून मुसळधार पाऊस कोसळत आहे. गुरुवारी रात्री कोसळलेल्या मुसळधार पावसात शहरातील गवळी तिठा परिसरात रत्नाकर माळी यांच्या मालकीच्या श्रीकृष्ण प्रेसच्या पाठीमागील भिंत मुसळधार पावसात खचून कोसळली.
याशिवाय त्या ठिकाणी राहत असलेल्या शुभम गवळी यांची भिंत व त्याच परिसरात असलेली सार्वजनिक विहीरही कोसळली यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबतची कल्पना माजी नगराध्यक्ष श्री. साळगावकर यांना समजतात त्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन वस्तुस्थितीची पाहणी केली. ते म्हणाले, झालेल्या प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेमध्ये तब्बल सात ते आठ लाखाचे नुकसान झाले असून तेथील सार्वजनिक विहिरी कोसळल्याने पाण्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. आपण या संदर्भात प्रांताधिकारी तसेच तहसीलदार यांचे लक्ष वेधले असून त्यांनी तात्काळ घटनास्थळी शहर तलाठी तसेच अन्य कर्मचाऱ्यांना पंचनामासाठी पाठवले. पावसाळ्यामध्ये झालेल्या प्रकारामुळे माळी तसेच गवळी कुटुंबावर आर्थिक संकट उभे राहिले आहे.