कोलगाव आयटीआय जवळ रस्त्यावर भगदाड

सार्वजनिक बांधकामचं दुर्लक्ष
Edited by: विनायक गांवस
Published on: September 04, 2025 17:32 PM
views 107  views

सावंतवाडी : जुन्या मुंबई - गोवा हायवेवर कोलगाव आयटीआय जवळ रस्त्याच्याकडेने भगदाड पडण्यास सुरुवात झाली होती. मात्र, महिनाभर सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने आता भर रस्त्यात मोठं भगदाड पडलं आहे. यामुळे छोट्या-मोठ्या वाहनांची एकेरी वाहतूक सुरू असून अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे जीव गेल्यावरच प्रशासन जागे होणार का ? असा सवाल प्रवासी, स्थानिक करत आहेत. 

मुंबई - गोवा जुन्या हायवेवर कोलगाव आयटीआय जवळ रस्त्याच्याकडेने एक महिन्यापूर्वी भगदाड पडयला सुरूवात झाली होती. मात्र, भलत्याच कामात व्यस्त असणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले. अन् हायवेचा अर्धा रस्ताच भगदाडात गेला आहे. यामुळे दोन दिवसांपूर्वी प्रशासनाकडून त्या ठिकाणी चिरे अन् बॅरीकेट लावून हा अर्धा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभाराचा परिणाम ऐन गणेशोत्सवामध्ये झाला आहे. गणेश चतुर्थीपूर्वी हा रस्ता सुरक्षित ठेवण आवश्यक होत. मात्र, बांधकाम विभागाकडून ते झालं नाही. त्यांच आश्वासनही हवेतच विरल.

कोलगाव आयटीआयच्या ठिकाणी जुन्या मुंबई-गोवा महामार्गावर भगदाड पडल्याने एकेरी वाहतुकीचा सामना वाहन चालकांना करावा लागत आहे.  आधीच अरुंद रस्ता त्यात एकेरी वाहतूक यामुळे ट्रक, डंपर, एसटी बसेसह छोट्या वाहनानांची कोंडी होत आहे. ऐन गणपती उत्सवाच्या काळात वाहन चालकांना ही डोकेदुखी बनली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या संदर्भात तात्काळ उपयोजना करण्याची मागणी होत आहे. 

दरम्यान, कोणाचा जीव गेला की सार्वजनिक बांधकाम विभागला जाग येणार का ? असा सवाल येथील स्थानिक विचारत आहेत. स्कुल बसेसच्या चालकांसह एसटी चालकांना देखील तारेवरची कसरत करावी लागते आहे. त्यात आमदार, खासदार, पालकमंत्री, मंत्री याच रस्त्यावरून जात असताना सार्वजनिक बांधकामचे अधिकारी एवढे निद्रीस्त कसे ? हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत असून मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी यावर तात्काळ तोडगा काढावा अशी मागणी केली जात आहे. अन्यथा, या दुर्घटनेस सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी जबाबदार राहतील असा इशारा स्थानिकांस प्रवाशांनी दिला आहे.