गणेशोत्सव काळात वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याची मागणी

वीज ग्राहक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपकार्यकारी अभियंत्यांची घेतली भेट
Edited by: विनायक गांवस
Published on: July 12, 2025 17:50 PM
views 18  views

सावंतवाडी : कोकणातील मुख्य सण गणेशोत्सव जवळ येत असल्याने गणेशोत्सव कालावधीत आणि उत्सवपूर्व गणेश शाळांना अखंडित वीज पुरवठा व्हावा तसेच वारंवार वीज खंडित होण्याचे प्रकार थांबवावेत यासाठी सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपकार्यकारी अभियंता शैलेश राक्षे यांची भेट घेतली. यावेळी तालुक्यातील इतर डिव्हिजनच्या अधिकाऱ्यांना देखील उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते. 

यावेळी सहा.अभियंता श्रीम.वीणा मठकर, सहा.अभियंते विठ्ठल काटकर ग्रामीण- २ यांच्यासह प्रभारी जिल्हाध्यक्ष संजय लाड, जिल्हा सचिव दीपक पटेकर, जिल्हा उपाध्यक्ष बाळ बोर्डेकर, तालुका सचिव संतोष तावडे, तुकाराम म्हापसेकर आदी उपस्थित होते. यावेळी वीज ग्राहक संघटना स्मार्ट प्रीपेड मीटर बसविण्याच्या विरोधात असून ग्राहकांना फसवून एकही मीटर बसवू नये असे उपकार्यकारी अभियंता यांना सांगण्यात आले. सावंतवाडी तालुक्यात यापूर्वी कधीही एवढ्या प्रमाणात वीज खंडित होण्याचे प्रकार होत नव्हते परंतु शहरात मोठ्या प्रमाणावर वीज खंडित होण्याचे प्रकार वाढले याबाबत सहा.अभियंता शहर - २ च्या श्रीम.मठकर यांना प्रश्न केला असता, गेल्या वर्षीपर्यंत ११० दाब होता तो वाढून यावर्षी १५० पर्यंत गेल्याने वीज खंडित होण्याचे प्रकार वाढले असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर शहरात गरड मध्ये जरी प्रॉब्लेम झाला तरी तेथील सप्लाय बंद करण्यासाठी काही क्षण मेन लाइन बंद करावी लागते. अशावेळी वीज ट्रिप झाली आणि काही क्षणात आली म्हणजे खंडित होत नाही तर सुरक्षित काम करण्यासाठी तसे करावे लागते. लवकरच यावर देखील तोडगा काढला जाईल असे त्यांनी आश्वस्थ केले.

गणेशोत्सव जवळ येत असल्याने आणि प्रत्येक गावात दोन चार गणपती शाळा आहेत. त्यामुळे गावातील वीज पुरवठा जास्तवेळ खंडित राहू नये यासाठी काय तयारी केली..? या प्रश्नावर श्री राक्षे यांनी मेन लाइन आणि एल टी लाईन वरील झाडी तोडण्याचे काम प्राधान्याने घेतल्याचे सांगून कुणकेरी येथील झाडी तोडण्यासाठी पगारावर मदतनीस देण्याची मागणी केली. त्यावर पदाधिकाऱ्यांनी कामगार देतो असे सांगितले. संचयनी जवळील औदुंबर झाडाची धोकादायक फांदी तोडण्याबाबत देखील चर्चा झाली. परंतु ती तोडण्यासाठी खर्च कोणी पेलावा ? यावर चर्चा अडली. त्यावरही लवकरच तोडगा काढण्याचे ठरविण्यात आले. सावंतवाडी शहर अंडरग्राऊंड करण्यासाठी निधीची मागणी केल्याचे त्याचप्रमाणे सावंतवाडी शहरासाठी वीज पुरवठा करण्यात येणाऱ्या वीज वाहिन्यांचे चार पर्याय उपलब्ध असल्याचे, तसेच सब स्टेशन मध्ये एखाद्या ट्रासफॉर्मरमध्ये बिघाड झाल्यास अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर देखील उपलब्ध करून ठेवल्याचे त्यांनी चर्चेदरम्यान सांगितले. 

    मळेवाड ते तळवडे नवीन लाईनचे काम पूर्ण झाले असून सुरक्षा टेस्ट झाल्यावर ती सुरू करण्यात येईल  त्याचप्रमाणे गणेशोत्सव पूर्वी ओटवणे येथील वीज वाहिनीचे काम देखील पूर्णत्वास नेण्यात येईल याची खात्री दिली. यावेळी उपस्थित वीज ग्राहकांनी स्मार्ट प्रीपेड मीटर आपल्या घरी बसवू नये यासाठीचे छापील अर्ज भरून कार्यालयात देत पोच घेतली. सदर चर्चेसाठी श्यामसुंदर रेडकर, मनोज घाटकर, श्रीकृष्ण तेली, जीवन लाड, प्रमोद मेस्त्री, तेजस लाड आदी पदाधिकारी, वीज ग्राहक उपस्थित होते.