
सावंतवाडी : पर्यटकांमध्ये लोकप्रिय ठरलेला कुंभवडे धबधबा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी येथे येणाऱ्या पर्यटकांकडून प्रवेश शुल्क आणि पार्किंग शुल्क आकारले जात असले तरी त्या बदल्यात कोणतीही अधिकृत पावती दिली जात नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे.
कुंभवडे बाबा धबधबा ही एक खाजगी मालमत्ता आहे. येथील व्यवस्थापनाने पर्यटकांसाठी काही नियम आणि शुल्क निश्चित केलेत. त्यानुसार, प्रत्येक व्यक्तीसाठी ५० रुपये प्रवेश शुल्क तेही केवळ रोख स्वीकारले जात आहे. तसेच, टू-व्हिलरसाठी ५० रुपये, फोर-व्हिलरसाठी १०० रुपये आणि मोठ्या गाड्यांसाठी (बस/ट्रक) २०० रुपये पार्किंग शुल्क घेतले जातेय. सायंकाळी ५ नंतर पाण्याच्या धबधब्याखाली जाण्यास मनाई असून ६ वाजता धबधबा पूर्णपणे बंद केला जातो. गैरवर्तन केल्यास पोलीस कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. व्यवसायाच्या दृष्टीने पाहिले असता कोणत्याही प्रकारचा शुल्क आकारताना त्याची रीतसर पावती देणे हे आवश्यक होते.
पावतीमुळे पारदर्शक व्यवहार होतो. परंतु, कुंभवडे येथे शुल्क आकारले जात असूनही पावती दिली जात नसल्याने या आर्थिक व्यवहारांच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या संदर्भात स्थानिक प्रशासनाने आणि संबंधित कर विभागाने लक्ष घालून योग्य चौकशी करावी आणि नियमांचे पालन सुनिश्चित करावे, अशी मागणी पर्यटकांकडून केली जात आहे. निसर्गरम्य ठिकाणे पर्यटकांसाठी उपलब्ध असणे चांगले आहे. परंतु, ते कायदेशीर आणि पारदर्शक पद्धतीने चालवले जाणे तितकेच महत्त्वाचे आहे अशी भावना व्यक्त केली जात आहे.