
सावंतवाडी : शहरातील संस्थानकालीन वारसा असलेल्या जिल्हा कारागृहाला धोका निर्माण करणाऱ्या सर्वांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी केली आहे.
सावंतवाडी शहरातील संस्थानकालीन व ऐतिहासिक वारसा लाभलेल्या जिल्हा कारागृहाची संरक्षक भिंत कोसळली आहे. त्यामुळे बांधकाम विभागाच्या मर्यादा पुन्हा एकदा उघड्या झाल्या आहेत. कोणताही अभ्यास न करता, बांधकाम क्षेत्रातील तज्ञ अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन न घेता आलेला निधी खर्ची घालायचा व त्यातून मिळालेले कमिशन वाटून घ्यायचे या गोरख धंद्यात अडकलेले अधिकारी सत्ताधारी राजकारण्यांच्या तालावर नाचत आहेत. दगडी भिंतीवर सिमेंटचे नवीन बांधकाम टिकणार नाही याची साधी जाणीव नसणाऱ्या बांधकामाच्या अधिकारी वर्गाने शासनाच्या लाखो रुपयांची नाहक उधळपट्टी केलेली आहे. त्यामुळे या सर्व कामाची सखोल चौकशी करण्यात यावी व जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी ॲड. अनिल केसरकर यांनी केली आहे.