
सावंतवाडी : मळेवाड गावात बऱ्याच ठिकाणी सध्या विद्युत वाहिन्यांवर, विद्युत पोलवर झाडी वाढून ते धोकादायक स्थितीत आहेत. त्यामुळे नेहमी प्रमाणे जरा कुठे पाऊस, वारा आला की कायमच येथील बत्ती गुल होत असते. त्यात करून लाईट बाबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर कॉल लागत नाही. हे तर रोजचेच प्रकार घडत आहेत. मात्र विद्युत बिले भरमसाठ वाढत आहेत.
एखाद्या वेळी अशा प्रकारची घटना निदर्शनास आणली की,नेहमी प्रमाणे "करतो" हेच उत्तर असते मात्र वेळ गेली की कोणीही तिथे बघत नाही असाच काहीसा प्रकार मळेवाड चराटकर वाडी येथे निदर्शनास पडत आहे. येथील विद्युत पोल वरील अनावश्यक तारा ह्या जमिनीवर लोंबकळत असून ह्या पोलवर अगदी हाताला मिळतील अशा फ्यूज असून ह्या तुटलेल्या स्थितीत असून त्याला चक्क काठीचा आधार देण्यात आला आहे. सध्या पावसाचे दिवस असून या पोलच्या बाजूला येथील शेतकऱ्यांची शेती असून,येथून पुराचे पाणी वाहत असते.त्याच प्रमाणे येथे घरे असल्याकारणाने येथील लहान लहान मुले,शेतकरी ग्रामस्थ यांची सतत ये - जा असते. मात्र एवढ असतानाही ह्या पोलवरील तारा,तुटलेल्या काठीचा आधार दिलेल्या फ्यूज बदलायला या विभाकडे वेळच नाही.म्हणजे एखादी मोठी दुर्घटना घडली किंवा निवेदन दिली तरच ही कामे होणार काय? असा संतप्त सवाल येथील ग्रामस्थ करत आहे.त्यामुळे लवकरात लवकर याबाबत योग्य ती कारवाई करून पुढील होणारा अनर्थ टाळावा ही मागणी होत आहे.