
सावंतवाडी : पृथ्वी हे अनमोल रत्न आहे. त्याची जपवणूक करा, पृथ्वीचे मूळ स्त्रोत पाणी आहे.पाण्याला कोणताही पर्याय नाही ते तयार करू शकत नाही. पाणी वाचविणे म्हणजे पाणी निर्माण करण्यासारखेच आहे. ते देशहिताचं कार्य आहे असं प्रतिपादन माजी प्राचार्य गिरीधर परांजपे यांनी सावंतवाडी येथील 'जलसंवर्धन' सप्ताहाच्या शुभारंभ प्रसंगी केलं. सावंतवाडी तालुका पत्रकार संघ, वनविभाग सावंतवाडी आणि राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ते बोलत होते.
निवृत्त प्राचार्य गिरीधर परांजपे यांच्या संकल्पनेतून जलसंवर्धन तथा पाणी अडवा, पाणी जिरवा हा संदेश देण्यासाठी जलसंवर्धन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. याचा शुभारंभ शि.प्र.मंडळाचे अध्यक्ष विकास सावंत, प्रा. गिरीधर परांजपे, सहाय्यक वनसंरक्षक डॉ. सुनील लाड, वनक्षेत्रपाल मदन क्षिरसागर, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत राणी पार्वती देवी हायस्कूलच्या सभागृहात करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दिपप्रज्वलनानं कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी पत्रकार शिवप्रसाद देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
याप्रसंगी प्रमुख वक्ते निवृत्त प्राचार्य गिरीधर परांजपे यांनी पाणी अडवा, पाणी जिरवा या अत्यावश्यक जीवन योजनेबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केलं. ते म्हणाले, पृथ्वी हे अनमोल रत्न आहे. त्याची जपवणूक करा, पृथ्वीचे मूळ स्त्रोत हे पाणी आहे. पाण्याला कोणताही पर्याय नाही ते तयार करू शकत नाही. प्रत्येक गोष्ट पाण्यावर अवलंबून आहे. पाण्याचे साठे मर्यादित आहेत. त्यामुळे पाणी जमिनीत मुरवणे आवश्यक आहे. पाणी वाचविणे म्हणजे पाणी निर्माण करण्यासारखेच आहे. पाण्याच अपव्यय टाळून त्याची बचत करणं हे देशहिताचं कार्य आहे असं मत श्री. परांजपे यांनी व्यक्त केलं.
याप्रसंगी वनक्षेत्रपाल मदन क्षिरसागर यांनी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थी वर्गांला मार्गदर्शन केलं. जीवसृष्टीचे असस्तित्व पाण्यातून आहे.निसर्गाशिवाय पाणी तयार होत नाही. बेसुमार पाणी उपसल्याने जमिनीची जल पातळी कमी होत आहे. त्यासाठी पाण्याची बचत करण, संवर्धन करणं आणि पाण्याच प्रदूषण रोखणे काळाची गरज आहे असं मार्गदर्शन केल. तर पाणी म्हणजे जीवन आहे. परिणामकारक घटकामुळे जलचक्र विस्कळीत झाले आहे. निसर्गसाठी पाणी महत्त्वाचे आहे. त्याच संवर्धन करा असा संदेश सहाय्यक वनसंरक्षक डॉ. सुनील लाड यांनी दिला. जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना, पाण्याचा तुटवडा आम्ही पाहतो अनुभवतो. त्यामुळे हा उपक्रम काळाची गरज बनला आहे असे उद्गार काढले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विकास सावंत म्हणाले, पाणी अनमोल असून पाण्याचे महत्त्व यापूर्वीच्या पिढ्यांनाही जाणले आहे. भूगर्भातील पाणी साठा कमी होत आहे. सर्वांच्या जीवनाच्या निगडित असलेल्या पाण्याचे गांभीर्य लक्षात घ्या अन् जल संवर्धन करा. त्यासाठी विविध उपक्रम हाती घ्या असं आवाहन त्यांनी केलं. तर गाळ काढण्यासाठी मोती तलाव आटव्यानंतर शहरात निर्माण झालेल्या पाणी टंचाईच उदाहरण देत पुनर्वजांच्या दुरदृष्टीचे दाखले देत पाण्याची बचत कशी करता येईल यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करायला हवेत असं मत व्यक्त केले. यानंतर शाळेच्या परिसरात ५'×३'×२' मापाचा चर खणून पावसाळ्यात पाणी मुरवण्यासाठीच्या पाणी अडवा, पाणी जिरवा योजनेचा शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विकास सावंत, माजी प्राचार्य गिरीधर परांजपे, सहाय्यक वनसंरक्षक डॉ. सुनील लाड, वनक्षेत्रपाल मदन क्षिरसागर, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, आरपीडी हायस्कूलचे उपमुख्याध्यापक अरविंद साळगावकर, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, माजी अध्यक्ष प्रविण मांजरेकर, सोशल मिडिया जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, शिवप्रसाद देसाई, वनपाल प्रमोद राणे, दत्ता पाटील, ज्येष्ठ पत्रकार राजू तावडे, पत्रकार संघाचे उपाध्यक्ष दीपक गांवकर, खजिनदार रामचंद्र कुडाळकर, सहसचिव विनायक गांवस, मोहन जाधव, नरेंद्र देशपांडे, हर्षवर्धन धारणकर, अनंत जाधव, शुभम धुरी, अनुजा कुडतरकर,भुवन नाईक, नितेश देसाई, आरपीडीचे पर्यवेक्षक पी.एम. सावंत, शिक्षक दशरथ शृंगारे, सौ. तोंडवळकर, विद्यार्थी उपस्थित होते.