उतरताना अंदाज चुकला ; रेल्वेखाली येता येता वाचला

काळजाचा ठोका चुकवणारा क्षण समोर
Edited by: मनोज पवार
Published on: August 30, 2025 16:46 PM
views 513  views

रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या रत्नागिरी स्थानकात आज मोठी दुर्घटना घडताना सुदैवाने टळली. चालत्या ट्रेनमधून उतरणारा तरुण पडला आणि ट्रेन खाली जात होता. पण प्लॅटफॉर्मवर चहा विकणारा युवक व सोबतचच सेवेत असलेल्या दोन आरपीएफ जवानांच्या सतर्कतेमुळे युवकाचे प्राण वाचले. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

आज सकाळी एलटीटी - सावंतवाडी सकाळी 6 वाजून 41 मिनिटांनी रत्नागिरी च्या प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर दाखल झाली. ट्रेन प्लॅटफॉर्मवर थांबण्यापूर्वीच यातील एक तरुणाने ट्रेन मधून उतरण्याचा प्रयत्न केला. या चुकीच्या प्रयत्नांत हा तरुण चालत्या ट्रेन च्या खाली येणार होता. पण तो पडताच प्लॅटफॉर्म वर कार्यरत असलेल्या कोकण रेल्वेच्या दोन आर पी एफ जवान आणि एका  विक्रेत्याने सतर्कता दाखवत त्याला वेगाने बाजूला ओढले. त्यामुळे त्याचे प्राण वाचले. विक्रेता वीर सिंग याने प्रथम या युवकाला ओढले व त्याच्या मदतीला क्षणात कोकण रेल्वेचा आरपीएफ जवान रणजीत सिंह आणि महेंद्र पाल धावले. त्यांनी वेळीच ओढले व ट्रेन खाली जाण्यापासून वाचवले. त्याच्याबरोबर प्रवास करीत असलेल्या प्रवाशांकडून मिळालेल्या  माहितीनुसार हा तरुण गोळप रत्नागिरी येथील असल्याची माहिती पुढे आली आहे. या जखमी तरुणावर कोकण रेल्वेच्या  पथकाने तात्काळ प्रथमोपचार केले आणि पुढील उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. प्लॅटफॉर्मवर कार्यरत दोन आरपीएफ व विक्रेत्यांनी समयसूचकता दाखवत केलेल्या हालचालीमुळे केवळ त्याचे प्राण वाचले. 

या घटनेची दखल कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी तिघांचे ही विशेष कौतुक केले आहे. संतोष कुमार झा यांनी या तिघांना ही प्रत्येकी पाच हजार रुपयांचे अवॉर्ड जाहीर करून ते तात्काळ त्यांना प्रदान करण्यात आले आहे.