
सावर्डे: “कुष्ठरोग अनुवंशिक नाही, तो कोणालाही होऊ शकतो. सर्व सांसर्गिक रोगांपैकी कुष्ठरोग हा सर्वात कमी सांसर्गिक आहे. 98 टक्के जनसामान्यात नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती असल्याने हा रोग सहज होत नाही. परंतु लक्षणे ओळखून योग्य निदान व नियमित उपचार केल्यास कुष्ठरोग पूर्णपणे बरा होऊ शकतो,” असे मत सावर्डे प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक व व्याख्याते प्रफुल्ल केळसकर यांनी व्यक्त केले.
सह्याद्री शिक्षण संस्था आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, सावर्डे यांच्या संयुक्त विद्यमाने गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथे “कुष्ठरोग निर्मूलन” या विषयावर जनजागृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण, कम्युनिटी हेल्थ ऑफिसर स्वाती सालवार तसेच शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
व्याख्यानादरम्यान प्रफुल्ल केळसकर यांनी कुष्ठरोगाची कारणे, लक्षणे, निदान आणि उपचार पद्धती यांची सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “लवकर निदान व नियमित उपचाराने कुष्ठरोगामुळे होणारी शारीरिक विकृती व विद्रुपता टाळता येते. समाजातील गैरसमज व भीती दूर करून जनजागृती घडवून आणणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.”
विद्यार्थ्यांनी सत्रादरम्यान उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारले व आपले शंका निरसन केले. व्याख्यात्यांनी अत्यंत सोप्या भाषेत उत्तरे देऊन विद्यार्थ्यांना कुष्ठरोगाविषयीचे गैरसमज दूर करण्यास मदत केली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य राजेंद्र वारे यांनी प्रस्ताविकातून व्याख्यानाचा उद्देश स्पष्ट केला आणि कुष्ठरोग निर्मूलनासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन केले.










