सावर्डे विद्यालयाचा जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत दबदबा

कोल्हापूर विभागीय स्पर्धेत सावर्डे विद्यालय करणार जिल्ह्याचे प्रतिनिधित्व
Edited by: मनोज पवार
Published on: October 20, 2025 13:03 PM
views 11  views

सावर्डे : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे आणि रत्नागिरी जिल्हा क्रीडा कार्यालय, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने एस. व्ही. जे. सी. टी. क्रीडा संकुल, डेरवण येथे जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ठ कामगिरी करत जिल्ह्यात आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

१४ वर्षे वयोगटात इच्छा राजभर हिने ४०० मीटर आणि ६०० मीटर धावण्यात प्रथम क्रमांक पटकावला, तर ४×१०० मीटर रिले मुली संघाने तृतीय क्रमांक मिळवला. १९ वर्षे वयोगटात अर्ष अडरेकर गोळाफेक द्वितीय, अजिंक्य भायजे थाळीफेक प्रथम, सलोनी नाचणकर ४०० मीटर द्वितीय, सलोनी घाणेकर २०० मीटर द्वितीय, तसेच ४×१०० मीटर मुली रिले संघाने तृतीय क्रमांक मिळवला.

१७ वर्षे वयोगटात वेदिका बामणे उंच उडी प्रथम, पृथ्वी राजभर ८०० मीटर आणि १५०० मीटर प्रथम, तर हुमेरा सय्यद ८०० मीटर आणि १५०० मीटर प्रथम क्रमांकावर चमकल्या. तसेच ४×४०० मीटर मुली रिले संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. या चमकदार कामगिरीमुळे विद्यालयाचे खेळाडू एकूण अकरा खेळ प्रकारांमध्ये रत्नागिरी जिल्ह्याचे कोल्हापूर विभागस्तरावर प्रतिनिधित्व करणार आहेत. या स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमधील खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

सावर्डे विद्यालयाने या स्पर्धेत उल्लेखनीय वर्चस्व प्रस्थापित करून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. खेळाडूंना प्रशिक्षण आणि मार्गदर्शन दादासाहेब पांढरे, रोहित गमरे, अमृत कडगावे आणि प्रशांत सकपाळ यांनी दिले.

 सावर्डे विद्यालयाचा विजय हा मेहनत, शिस्त आणि संघभावनेचे उत्तम उदाहरण ठरला आहे.

यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकांचे सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक व आमदार शेखरजी निकम,ज्येष्ठ संचालक व शालेय समितीचे चेअरमन शांताराम खानविलकर,संस्थेचे सर्व संचालक व पदाधिकारी, सचिव महेश महाडिक,शालेय समितीचे सर्व पदाधिकारी व विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण,विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले असून विभागस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.