सावर्डे विद्यालयाची जिल्हास्तरावर आगेकूच

Edited by: मनोज पवार
Published on: August 17, 2025 12:32 PM
views 47  views

सावर्डे : क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या विद्यमाने सह्याद्री क्रीडा संकुल, सावर्डे येथे तालुकास्तरीय पावसाळी हॉलीबॉल स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथील खेळाडूंनी दमदार कामगिरी करत यशाची घोडदौड केली.

या स्पर्धेत विद्यालयाच्या १९ वर्षे वयोगटातील मुलींचा संघ विजयी ठरला असून तो आता चिपळूण तालुक्याचे प्रतिनिधित्व जिल्हास्तरावर करणार आहे. अत्यंत चुरशीच्या सामन्यात सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंनी असुर्डे संघावर मात करत विजय मिळवला. या विजयी संघात आरती मकाळे, अवंती नरळकर, समृद्धी पाष्टे, श्रावणी कदम, श्रुती नरोटे, प्रिया पवार, यशस्वी पवार, भूमिका उत्तेकर, जागृती ओकटे, संयोगिता लाहीम आणि मधुराणी कातकर यांचा सहभाग होता.

याशिवाय, १४ वर्षे वयोगटातील मुलींचा संघ उपविजेता ठरला असून, १९ वर्षे वयोगटातील मुलांच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या तीनही गटांनी केलेली उल्लेखनीय कामगिरी विद्यालयाचा अभिमान वाढवणारी ठरली. या स्पर्धेत चिपळूण तालुक्यातील १८ शाळांनी सहभाग घेतला होता. संघाला मार्गदर्शन करण्याचे काम विद्यालयाचे क्रीडा शिक्षक दादासाहेब पांढरे, रोहित गमरे, अमृत कडगावे आणि प्रशांत सकपाळ यांनी केले. स्पर्धेचे उद्घाटन सह्याद्री क्रीडा प्रबोधिनीचे अध्यक्ष अनिरुद्ध निकम, सह्याद्री शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी महेशजी महाडिक आणि विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्रकुमार वारे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी बोलताना अनिरुद्ध निकम म्हणाले, “खेळाडूंनी खिलाडूवृत्ती जोपासून खेळ करावा. स्पर्धेत यशापयशाला सामोरे जाण्याची क्षमता जोपासली तरच खरी क्रीडा संस्कृती विकसित होते.”

सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंनी दाखवलेली जिद्द, चिकाटी आणि संघभावना यामुळेच त्यांना हे यश प्राप्त झाले असून, जिल्हास्तरीय स्पर्धेतही ते असाच विजयाचा धडाका कायम ठेवतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकांचे सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक व आमदार शेखरजी निकम,ज्येष्ठ संचालक व शालेय समितीचे चेअरमन शांताराम खानविलकर,संस्थेचे सर्व संचालक व पदाधिकारी, सचिव महेश महाडिक,शालेय समितीचे सर्व पदाधिकारी व विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र वारे, उपमुख्याध्यापक विजय चव्हाण,विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे. यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करताना उपप्राचार्य विजय चव्हाण व मार्गदर्शक शिक्षक