सावर्डे विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

Edited by: मनोज पवार
Published on: August 10, 2025 15:33 PM
views 137  views

सावर्डे : सह्याद्री शिक्षण संस्थेचे गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथे रक्षाबंधन हा मानवी नात्यांतील पवित्र व अलौकिक सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आपल्या रूढी-परंपरांचा वारसा जपत व विद्यार्थ्यांमध्ये बंधुभावाची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी एकमेकांना राखी बांधत हा सण साजरा केला. या निमित्ताने विद्यालयातील सर्व महिला कर्मचाऱ्यांनी विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांना राखी बांधून बंधुभावाचे नाते दृढ केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये अमृता घाग यांनी भाऊ-बहिणींच्या नातेसंबंधावर विविध उदाहरणांद्वारे प्रकाश टाकला.

विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे यांनी पुरातन काळातील व आधुनिक काळातील दाखले देत समाजातील नातेसंबंधांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी रक्षाबंधनाचा सांस्कृतिक आणि सामाजिक पैलू स्पष्ट करून मानवी नात्यांची जपणूक करण्याचे आवाहन केले. सदर कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन शिक्षिका अपर्णा डिके व श्रुती जाधव यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयातील सर्व महिला कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाला प्राचार्य, उपप्राचार्य, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये परंपरा, प्रेम, आपुलकी आणि ऐक्याची भावना दृढ करणारा ठरला.