
सावर्डे : महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या आदेशानुसार "हर घर तिरंगा" उपक्रमांतर्गत स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डेच्या विद्यार्थिनींनी विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे उपप्राचार्य विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली रक्षाबंधनाचा एक आगळा-वेगळा उपक्रम राबवला.
या उपक्रमात सावर्डे पोलीस स्टेशनमधील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रेम, आदर व कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून राख्या बांधण्यात आल्या. तसेच त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून प्रत्येक विद्यार्थिनीने स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेला "मानपत्र" भेट म्हणून देण्यात आला. या प्रसंगी पोलीस उपनिरीक्षक श्री. आबासो पाटील, पोलीस हवालदार कांबळे, गमरे, कमरे मॅडम, सावंत मॅडम यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांना राख्या व मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यालयाच्या वतीने दादासाहेब पांढरे, रोहित गमरे, अमृत कडगावे उपस्थित होते.
उपक्रमात विद्यार्थिनी श्रावणी राठोड, सुमैया बटे, प्रियंका पवार, भाविका राजेशीर्के, प्राची मोहिते, पूर्वा होडे, दूर्वा कोकाटे यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. रक्षाबंधनाच्या या स्नेहबंधनाने पोलीस आणि विद्यार्थिनींमध्ये आत्मीयतेचे नवे नाते जोडले गेले.