प्राथमिक शाळांची शनिवारची वेळ बदलू नये

शिक्षक समितीची मागणी
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: June 28, 2024 14:31 PM
views 31  views

सिंधुदुर्गनगरी : शासन परिपत्रक ९ मार्च २०२४ नुसार राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि व्यवस्थापनांच्या शाळांमधील पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी ९ वाजता किंवा ९ नंतर भरवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.परंतु सदरचा आदेश हा संपूर्ण आठवडाभर सकाळ सत्रात भरविल्या जाणाऱ्या शाळांसाठी असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ह्या आठवड्यातील  पाच दिवस सकाळी साडेदहा ते साडेचार अशा वेळेत भरविल्या जातात. फक्त शनिवारी एकच दिवस साडेसात ते अकरा अशी वेळ असल्याने या वेळेत बदल न करता ती वेळ तशीच ठेवण्यात यावी. अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा सिंधुदुर्ग च्या वतीने करण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक शाळा शनिवारी सकाळी लवकर भरत असल्याने सदरचा दिवस शाळांमध्ये शासन निर्णयाप्रमाणेच "आनंददायी शनिवार","दप्तराविना शाळा" हे उपक्रम राबविणे सोयीस्कर ठरणार आहे. तसेच शनिवारच्या दिवशी शाळांमध्ये योगासने,व्यायाम, कवायत,ध्यानधारणा इत्यादी उपक्रम राबविले जातात. त्यामुळे आठवड्यातून फक्त एकच दिवस सकाळ-सत्र शाळा असल्याने शनिवारची शाळांची वेळ बदलण्यात येऊ नये. अशी आग्रही मागणी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस व सरचिटणीस तुषार आरोसकर यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मकरंद देशमुख यांचे कडे निवेदनाद्वारे केली आहे.विविध कारणांमुळे विद्यार्थी रात्री उशीरा झोपतात. शाळांची वेळ सकाळी ७ वाजता असल्याने विद्यार्थ्यांची झोप पूर्ण होत नाही.