ग्रा.पं.च्या मनमानी कारभाराविरोधात सटमठवाडीवासीयांचं उपोषण

Edited by: विनायक गांवस
Published on: August 14, 2025 12:40 PM
views 168  views

सावंतवाडी : सटमठवाडी गावातील अपूर्ण सुविधा आणि ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ गावातील रहिवासी उद्या 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी उपोषण करणार आहेत. सजग युवक आणि रहिवासी देवानंद सहदेव कळंगुटकर यांनी ही माहिती दिली आहे. 

गावातील विविध समस्या वारंवार प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. कळंगुटकर यांनी उपोषणामागील काही प्रमुख कारणे सांगितली आहेत. ज्यामध्ये गावातील अपूर्ण रस्ते आणि इतर सुविधांचा समावेश आहे. ग्रामपंचायतने खोट्या सह्या घेऊन सर्व्हिस रोडच्या आराखड्यात बदल करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप आहे. यामुळे हा रोड अर्धवट स्थितीत असून व्यापारी आणि व्यावसायिकांना याचा मोठा त्रास होत आहे. या रस्त्यामुळे अपघात वाढले असून लोकांना वाहतुकीसाठी मोठी गैरसोय होत आहे. अपघात कमी करण्यासाठी मंजूर झालेला बोगदा आता अधिक धोकादायक बनला आहे. हायवेवरील व्यावसायिक सर्व्हिस रोडवर गाड्या पार्क करत असल्याने, गावातील लोकांना ये-जा करताना अडचणी येत आहेत. अशा परिस्थितीत अपघात झाल्यास, ग्रामपंचायतच पूर्णपणे जबाबदार असेल असा इशारा दिला आहे. 

बांदा-डिंगणे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत मंजूर झालेला रस्ता अर्धवट सोडल्याने वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. तसेच, सटमठवाडीतून बांदा येथे जाणारी पाणीपुरवठ्याची पाईपलाईन वारंवार तुटते, याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप आहे. ग्रामपंचायत प्रत्येक वेळी कामे पूर्ण करण्याचे आश्वासन देऊन ग्रामस्थांची फसवणूक करत असल्याचा आरोपही केला आहे. 26 क्रमांकाच्या रोडला लागलेला रोड नसल्याचे कारण देत ग्रामपंचायत हे काम टाळत आहे.

या सर्व गंभीर समस्यांमुळे त्रस्त झालेले सटमठवाडीतील ग्रामस्थ उद्या स्वातंत्र्यदिनी उपोषण करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणार आहेत. वर्षानुवर्षे याच समस्यांना किती दिवस सहन करणार ? असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.