
सावंतवाडी : तालुक्यातील दाणोली येथील श्री समर्थ साटम महाराज समाधी मंदिरामध्ये तुकाराम बीज निमित्तान श्री समर्थ साटम महाराजांचा ८६ वा पुण्यतिथी उत्सव गुरुवार ९ मार्च रोजी साजरा करण्यात आला. श्री समर्थांचा पुण्यतिथी उत्सव तुकाराम बीज दिवशी साजरा करण्यात येतो. त्या निमित्ताने विविध कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले. धार्मिक, आध्यात्मिक कार्यक्रमासह भजन, कीर्तन, संगीत कार्यक्रम, दशावतारी नाटक पार पडले.
देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त श्रीमंत खेमराजे शिवराम सावंत - भोसले, युवराज लखमराजे भोसले यांच्याहस्ते सकाळी पूजा, अभिषेक पार पडला. यानंतर शेकडो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. श्री समर्थ साटम महाराज यांचे दाणोली येथे समाधी मंदिर आहे.तसेच जवळच निवास आणि नागझर या भागात देखील भाविक मोठ्या भक्तीभावाने दर्शन घेण्यासाठी उपस्थित राहिले. या उत्सवासाठी देवस्थान ट्रस्ट विश्वस्त यासाठी पुढाकार घेतात. यानिमित्ताने अलोट गर्दी देखील मंदिरामध्ये होती. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दर्शनाचा लाभ घेतला.