
सावंतवाडी : दरवर्षी ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा केला जातो. १९०८ मध्ये न्यूयॉर्कमध्ये महिलांनी आपल्या हक्कांसाठी आंदोलन केले आणि त्यानंतर १९११ पासून महिला दिन साजरा करण्याची परंपरा सुरू झाली. महिलांचे हक्क, समानता आणि सशक्तीकरण यावर प्रकाश टाकण्यासाठी हा दिवस जागतिक स्तरावर साजरा केला जातो. ह्याच जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सर्वोदय नगर महिला संघाने पहिल्यांदाच आगलळ्या वेगळ्या बहारदार कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक प्रदर्शन आणि महिलांच्या विशेष सन्मानाचा समावेश होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक अजय गोंदावळे यांच्या सौभाग्यवती शीतल गोंदावळे, सर्वोदय नगर महिला संघ अध्यक्षा सौ.दिशा कामत, सचिव मेघना राऊळ आणि सर्वोदय नगर रहिवासी संघ अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते श्री. सुनील राऊळ व ज्येष्ठ महिला यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी उपस्थित सुनील राऊळ, शीतल गोंदावळे, सौ. दिशा कामत, मेघना राऊळ यांनी तमाम महिला वर्गाला महिला दिनाच्या शुभकामना दिल्या.
सर्वोदय नगरमधील श्रमिक व कष्टकरी महिलांचा सत्कार
यावेळी अत्यंत कष्टातून संसार चालविणार्या सर्वोदय नगरातील निवडक महिलांना सन्मानित करण्यात आले. यात सौ. संध्या संतोष मटकर, सौ. आरती अरुण पडवळ, श्रीमती कविता विजय पडवळ, कुमारी नेहा शिराजूद्दीन शेख, आणि मल्लम्मा कोरे या महिलांचा समावेश होता. दरम्यान, महिला व मुलींसाठी विविध गुणदर्शनपर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यात चिमुकल्यांसह सर्वोदय नगरातील महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला. आपल्या अंगी असलेल्या कला व विविध गुणांचे दर्शन यावेळी घडविले. संपूर्ण कार्यक्रम आनंदमय वातावरणात पार पडला आणि महिलांनी एकत्र येऊन आपला दिवस साजरा केला. महिला दिनाच्या निमित्ताने महिलांनी एकत्र येऊन सहकार्य, आत्मनिर्भरता आणि सशक्तीकरणाचा संदेश दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. पूनम नाईक आणि अमृता धुरी यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी छोटेखानी अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले होते.