कळणेच्या सर्वांगीण विकासासाठी सरपंच पदाच्या रिंगणात!

गावासाठी दिलेलं योगदान व गेल्या 30 वर्षात केलेलं कामच आपला जाहिरानामा : गणपत देसाई
Edited by: संदीप देसाई
Published on: December 16, 2022 09:49 AM
views 376  views

दोडामार्ग : गेल्या 30-35 वर्षात कळणे गावासाठी केलेली विविधागीं कामे आणि सातत्यपूर्ण गावच्या जडणघडणीत असलेलं योगदान यामुळे आम्हाला वेगळा प्रचार करून मत मागायची आवश्यकता नाही, गावकऱ्याना गावचा खरा व शाश्वत विकास कोण करू शकतो याची पक्की जाण आहे, त्यामुळे गावकरी व मतदार आपल्यालाच पहिली पसंदी देतील, निवडणूक ही केवळ औपचारिकता आहे असा विजयाचा दृढ विश्वास कळणे गावच्या सरपंच पदाचे उमेदवार व जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, शिवसेना नेते व जिल्हा बँक संचालक गणपत देसाई यांनी व्यक्त केला आहे.

     शिवसेना नेते गणपत देसाई, उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, महिला उपजिल्हाप्रमुख तथा गणपत देसाई यांच्या सौभाग्यवती संपदा देसाई यांच्या गावची कळणे -भिकेकोनाळ यांची ही ग्रामपंचायत असल्याने, भाजपला शिवसेना येथे टक्कर देणार आहे.मात्र कळणे व भिकेकॊनाळ येथे गणपत देसाई व बाबुराव धुरी यांनी गेल्या अनेक वर्षात केलेलं प्रभावी काम आणि स्वतः गणपत देसाई यांची भक्कम उमेदवारी यामुळे ही निवडणूक शिवसेनेसाठी सोपी झाली आहे.

    ग्रामपंचायत खरं तर गाव विकासाचं केंद्रबिंदू, आणि या विकास मंदिरात तितकेच खंबीर नेतृत्व गावकऱ्यांनी निवडून देऊन आपल्या गावचा सर्वांगीण विकास करून घ्यायला हवा. ज्या गावची नेतृत्व भक्कम त्या गावचं ग्रामविकासात तितकंच दमदार काम यासाठी गावकऱ्यांनी उमेदवारांची निवड करताना, त्यांना मतदान करताना पुढील पाच वर्षांचा विचार करायलाच हवा. कारण हिवरे बाजारचे शिल्पकार पोपटराव पवार, राळेगणसिध्दी ज्यांनी महाराष्ट्र भर नेली ते जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, आणि संबंध देशभर ज्या ग्रामपंचायत ची चर्चा आहे ते भास्करराव पेरे पाटील यांच पाटोदा गाव, या गावचा जो कायापालट झाला आणि संबंध राज्यभर ती गावे परिचित झाली ती या गावच्या नेतृत्व पणामुळे. अर्थात यात गावकऱ्यांचा सुद्धा तितकाच नेतृत्व निवडीचा सहयोग महत्त्वाचा आहे. 

   दोडामार्ग तालुक्यातील सुद्धा २३ ग्रामपंचायतच्या थेट सरपंच पदाच्या उमेदवारांसाठी निवडणूक होत आहे. थेट निवडणूक असल्याने या गावच्या निवडणूकिला जणू मिनी विधानसभा निवडणुक असंच महत्व गावोगावी प्राप्त झालंय. त्यामुळे ज्या गावचं नेतृत्व सक्षम त्या गावच्या विकासाची गतीही सुपरफास्ट, आणि असंच एक अनुभवी, प्रशासनातील जाणकार, उद्योजक, आणि खरा सामाजिक कार्यकर्ता असणार व्यक्तिमत्त्व दोडामार्ग तालुक्यातील कळणे ग्रामपंचायतच्या निवडणूक मध्ये निवडणूकिला सामोरे जात आहे. 

ज्यांचं नाव आहे गणपत देसाई.

    अगदी कॉलेज जीवनापासून ते गेल्या ३५ ते ४० वर्षांचा राजकारण, समाजकारण आणि उद्योग-व्यवसाय या सगळ्यांच क्षेत्रात सातत्याने कार्यरत असणारे दोडामार्ग तालुक्यातील एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून गणपत देसाई केवळ दोडामार्गच नव्हे तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याला परिचित आहे. कळणे सारख्या तब्बल  गावात ३० वर्षांपूर्वी ज्यांनी जानकी कश्यू उद्योग सुरू केला, यातच त्यांची दूरदृष्टी अधोरेखित होते. आज त्यांच्या या कारखान्यात जवळपास कळणे- दोडामार्ग तालुक्यातील ७० हुन अधिक महिला रोजगार मिळवीत  आहेत.

    अगदी कॉलेज जीवनात सावंतवाडी येथे एसपीकेत पदवीचे शिक्षण घेत असताना कॉलेजचा जीएस म्हणून त्यांनी राजकारण उडी मारली. त्यावेळी जिल्ह्यात काँग्रेसचा वरचष्मा होता. राजघराण्यातील शिवरामराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी त्यावेळी युवा वयातच राजकारणात प्रवेश केला. आणि प्रवेशच केला नाही तर त्यावेळी अखंड सावंतवाडी, दोडामार्ग तालुका असताना या माध्यमातून त्यांनी आपल्या नेतृत्वाची झलक अधोरेखित दाखवून दिली. त्यामुळे त्यांच्यावर दोडामार्ग तालुक्याची निर्मिती होताच तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविली, त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी मध्ये जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम केलं. 

   याच दरम्यान कळणे गावावर मायनींग सारखा राक्षसी प्रकल्पाच संकट आलं. आणि त्याच वेळी आपल्या गावचं भवितव्य डोक्यात असल्याचं पाहून त्यांनी या प्रकल्पाला गावासाठी आणि गावकऱ्यांसोबत आंदोलन उभारून कडाडून विरोध केला. अखंड पणे त्यांनी गावासाठी दिलेला लढा सर्वश्रुत आहे. मायनींग माफियांनी  अगदी खोटे नाटे आरोप करून त्यांना तुरुंगात डांबले तरी त्यांनी गावासाठी आपला लढा सुरूच ठेवला. आणि आजही तो सुरूच आहे. या लढ्यानंतर मात्र लढ्यात खंबीरपणे गावकऱ्यांची साथ देणाऱ्या शिवसेने सोबत जाण्याचा निर्णय घेतला. आणि त्याच वेळी झालेल्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीत त्यांच्या सौभाग्यवती सौ. संपदा देसाई या मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या. त्या नुसत्या निवडून आल्या नाहीत तर त्यांना जिल्हयाच्या डोंगरी विकास योजनेच्या सदस्यपदी निवड देण्यात आली. या माध्यमातून त्यांनी कळणे व दोडामार्ग मध्ये कोट्यवधींची कामे केली. जिल्हा परिषद च्या माध्यमातून शेकडो गावकऱ्यांना कृषी योजनांचा लाभ मिळवून दिला. आज त्या स्वतः शिवसेना उपजिल्हाप्रमुख म्हणून कार्यरत असून त्यांनाही प्रशासनाचा दांडगा अनुभव आज. इतकंच नव्हे तर यापूर्वी सुद्धा अनेकदा स्वतः गणपत देसाई यांनी गावच्या निवडणूक लढविल्या, जिंकल्या आणि सर्वांना त्याठिकाणी नेतृत्व करण्याची संधी दिली. स्वतः नेहमीच किंगमेकर च्या भूमिकेत असलेल्या देसाई यांचा गावच्या समाजकारण, राजकारण, सहकार, शिक्षण आणि उद्योग या सर्वच क्षेत्रात मोठं योगदान राहिलं आहे.  गेली ३० वर्षे गावची विविध कार्यकारी सोसायटी त्यांच्या नेतृत्वाखाली चालवली जाते, कळणे पंचक्रोशीच्या नूतन विद्यालयाच्या माध्यमातून त्यांनी कळणेतच नव्हे तर पंचक्रोशीतील लोकांसाठी शैक्षणिक गंगा आणली आणि आता ते स्वतः जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक म्हणून कार्यरत आहेत.  खासदार विनायक राऊत यांच्या खास विश्वासातील माणूस म्हणून त्यांची ओळख आहे. तर अन्य पक्षातील अनेक नेत्यांशी सुद्धा त्यांचे जवळचे संबंध आहेत. 

   आज सरपंच पदाची होणारी थेट निवडणूक आणि केंद्र आणि स्टेटचा ग्रामपंचायत ला येणारा थेट निधी, अनेकांगी केंद्र व राज्य शासनाच्या गाव व गावकरी यांच्यासाठी असणाऱ्या शेकडो योजना यामुळे गावासाठी आणि गावातील नागरिकांसाठी आपल्या अनुभवाचा, अभ्यासाचा आणि अनेक लोकनेत्यांशी असलेल्या परिचयाचा गावविकासाठी कुठे तरी लाभ व्हावा यासाठीच आपण थेट सरपंच पदाच्या निवडणुकीला सामोरे जात असल्याचे गणपत देसाई आवर्जून सांगतात, केवळ राजकारण हा आपला अजेंठा नाही तर सर्वसमावेशक समाजकारण, सामाजिक कार्य हाच आमचा पिंड असल्याने, आजवर गावासाठी आणि गावकऱ्यांसाठी दिलेल्या योगदानामुळे मला विजयाची चिंता नाही, विजय तर आमचा पक्काच आहे, त्यामुळे आता आमचं मिशन आहे ते कळणे गावाला खऱ्या ग्रामविकासाच्या प्रवाहात आणणे. आणि ते आम्ही करणारच. आज ज्या गावच्या ग्रामपंचायत ची सार्वत्रिक निवडणूक होत आहे, त्या ग्रामपंचायतची सुसज्ज इमारत सुद्धा जि. प. सदस्या संपदा देसाई आणि गणपत देसाई यांच्याच पुढाकाराने उभारलेली आहे. आता याच विकास मंदिरातून गावकऱ्यांची सेवा करण्याची संधी गावकऱ्यांनी द्यावी या मोठ्या अपेक्षेने ते कार्यरत असून या अभ्यासू व्यक्तिमत्वाच्या नेतृत्वामुळे कळणे गावच्या सर्वांगीण विकासाला मोठा वाव आहे.