
सावंतवाडी : बांदा येथिल श्री संत सोहिरोबानाथ आंबिये मठामध्ये गुरुप्रतिपदेला गुरूवार दि.१३ फेब्रुवारी रोजी संत सोहिरोबानाथ जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त मठात सकाळपासुन विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. या जयंती सोहळ्या पासुन श्रीरामनवमीपर्यंत मठात नाथ सेवा उत्सव चालणार आहे.
गुरूवारी सकाळी 8 वाजता संत सोहिरोबानाथांच्या मुळ पादुकांची पुजा अर्चा ,अभिषेक होईल.त्यानंतर तीर्थप्रसादास प्रारंभ होईल.सकाळी 9 वाजता संत सोहिरा चरित्रामृताचे वाचन होईल.दुपारी 1.15 वाजता महाआरती होईल. यावर्षी जयंतीदिनी गुरुवार आल्याचे औचित्य साधून सेवेकरी मंडळींच्या वतीने यंदा महाप्रसाद होणार आहे.सायंकाऴी 5 वाजता स्थानिक महिलांची भजन सेवा होईल.7.15 ला नित्य सायंआरती होईल त्यानंतर स्थानिक भजनकर्मींची भजनसेवा होईल.
नाथांच्या जयंतीपासून नाथ सेवा उत्सव आरंभ होत आहे.नित्य मंगळवारची भजन सेवा व गुरुवारची दुपारची आरती यांच्यासह उत्सवकाळात दर मंगळवारी सायं 5 ते 6 या वेळेत श्रीराम नामाचा जप होणार आहे. तसेच दर गुरुवारी सायंकाळी 5 ते 6 महिला भजनकर्मींची भजनसेवा होणार आहे.हा नाथ सेवा उत्सव नाथांचा निर्वाणदिन असलेल्या रामनवमीपर्यंत चालणार आहे.या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन संत सोहिरोबानाथ सेवेकरी भक्त परिवारातर्फे करण्यात आले आहे.