
सावंतवाडी : संकेश्वर ते रेडी हा राष्ट्रीय महामार्ग सावंतवाडी शहरातूनच जाणार आहे. या महामार्गामुळे शहरातील व्यापारात वाढ होणार आहे. श्री. केसरकर यांनी केलेल्या कामाचे नारळ फोडणे व टीका करण्यापलीकडे तेलींनी आजपर्यंत काही केले नाही. दरम्यान, शिवसेनेत कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेशांचा धडाका लावल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे असा टोला शिवसेना महिला जिल्हाप्रमुख ॲड. निता सावंत कविटकर यांनी लगावला.
महायुतीचे उमेदवार व शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी मतदारसंघातील प्रत्येक लहान मोठ्या गावात कोट्यावधींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यात रस्ते, पूल, पाणीपुरवठा योजना, हायमास्ट दिवे आदी अनेक योजनांचा समावेश आहे. मतदार संघ हा डोंगराळ असल्याने दोन तालुक्यांमध्ये डोंगरी विभागाची मान्यता मिळवून दिली आहे. मांगेली ते सडा, मोर्ले ते पारगड, तेरवन ते मेढे, तळकट ते कुंभवडे, फुकेरी हनुमंतगड ते चौकुळ, शिवापूर ते शिरशिंगे अश्या अनेक डोंगराळ भागातील रस्ते श्री. केसरकर यांनी पूर्ण केले. अशा प्रकारचे रस्त्यांचे जाळे पूर्ण मतदारसंघात विणण्यात आले आहे. संकेश्वर ते रेडी हा राष्ट्रीय महामार्ग सावंतवाडी शहराच्या मार्गे जाणार आहे. त्यामुळे शहरातील व्यापार वाढणार असल्याची माहिती त्यांनी दिली.










