रेडीतील संकल्प महिला ग्रामसंघाचे स्वयंरोजगाराच्या दिशेने पाऊल | ग्रामपंचायतचे विशेष पाठबळ

Edited by: विनायक गावस
Published on: August 18, 2023 19:55 PM
views 306  views

वेंगुर्ला : तालुक्यातील रेडी येथील संकल्प ग्रामसंघ मधील महिलांनी एकत्र येऊन पत्रावळी, द्रोण, ग्लास  बनविण्याचा कामाचा आज शुभारंभ केला असून या ग्रामसंघाने स्वयंरोजगाराच्या दिशेने एक नवीन पाऊल टाकले आहे. यासाठी रेडी ग्रामपंचायत कडून त्यांना कच्चा मालासाठी विशेष आर्थिक मदतीचे पाठबळ देण्यात आले.

रेडी गावातील ५ विविध ग्रामसंघाना, विविध रोजगार निर्मिती साठी प्रत्येकी ६० हजार देण्याचे निश्चित करण्यात आले असून यामुळे महिलांचे सक्षमीकरण होण्यास मदत होणार असल्याचे यावेळी सरपंच रामसिंग राणे यांनी सांगितले. तर गावातील विविध कार्यक्रम, सण, उत्सवसाठी ग्रामस्थांनी या ग्रामसंघाकडून पत्रावळी व इतर साहित्य खरेदी करून त्यांना उद्योग वाढीसाठी सहकार्य करावे असे आवाहन यावेळी जि. प. माजी आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांनी केले. यावेळी उपसरपंच नमिता नागोळकर व ग्रामसंघाच्या महिला उपस्थित होत्या.