ओंकार हत्तीला पकडण्यासाठी संजू परब यांचे वनसंरक्षकांना निवेदन

Edited by: विनायक गांवस
Published on: October 08, 2025 17:05 PM
views 107  views

सावंतवाडी : मडुरा परिसरात हत्तीच्या दहशतीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याने ओंकार हत्तीला त्वरित पकडण्यात यावे, अशी मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख संजू परब यांनी ग्रामस्थांतर्फे वनसंरक्षक मिलीश शर्मा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. 

मडुरा, सातोस आणि कास या गावांमध्ये रात्रीच्या वेळी हत्तीने धुमाकूळ घालत शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. ग्रामस्थांच्या तक्रारींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी आज करण्यात आली. या निवेदन स्वीकृतीवेळी वनसंरक्षक मिलीश शर्मा यांनी सांगितले की, “ओंकार हत्तीला पकडण्यासाठी वनविभागाने विशेष मोहीम हाती घेतली असून युद्धपातळीवर काम सुरु आहे. पुढील आठ दिवसांत हत्तीला पकडण्यात यश येईल,” असे आश्वासन त्यांनी जिल्हा प्रमुख संजू परब आणि उपस्थित ग्रामस्थांना दिले.तसेच, हत्तीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत पंचनामे करण्यात येत असून शासनाच्या निकषानुसार उपलब्ध ती मदत त्वरित देण्यात येईल, असेही शर्मा यांनी स्पष्ट केले. यावेळी उपसरपंच बाळू गावडे, सोमनाथ परब, दिलीप परब, नारायण परब, ज्ञानेश्वर परब, मनोहर परब, संतोष जाधव, प्रशांत परब, प्रशांत साटेलकर आणि परीक्षित मांजरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.ग्रामस्थांनी वनविभागाच्या त्वरित कारवाईचे स्वागत करत, हत्तीच्या दहशतीपासून गावकऱ्यांची सुटका होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.