
सावंतवाडी : शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या उपस्थितीत माडखोल जिल्हा परिषद मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या जवळपास २०० पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा धनुष्य बाण हाती घेतला. आगामी निवडणूकाच्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, कॉग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीचे उप तालुकाप्रमुख जीवन लाड, तालुका संघटक पंढरी राऊळ, ओबीसी तालुकाप्रमुख वासुदेव होडावडेकर, विभागप्रमुख दया सावंत, सांगेली माजी सरपंच रमाकांत राऊळ, ग्रा.प. सदस्य दीपक सांगेलकर, विकास राऊळ, दशरथ राऊळ, विष्णू कदम, प्रकाश राऊळ, माजी सरपंच सुवर्णा राऊळ आदींसह २०० पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत माजी मंत्री, आम. दीपक केसरकर, आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा पक्षप्रवेश घेण्यात आला. तसेच जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला घवघवीत यश संपादन करून देऊ असा विश्वास यावेळी प्रवेशकर्त्यांनी व्यक्त केला. यावेळी कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.