
सावंतवाडी : शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांचा ५२ वा वाढदिवस सावंतवाडीतील मॅंगो हॉटेलच्या सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर व आमदार निलेश राणे यांनी त्यांना शुभेच्छा देत वाढदिवसाचे अभिष्टचिंतन केले.
केक कापून संजू परब यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना उपनेते सचिन आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, संजय पडते, महिला जिल्हा आघाडी अध्यक्षा ॲड. निता कविटकर, विधानसभा प्रमुख प्रेमानंद देसाई, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, जिल्हा बँक संचालक विद्याधर परब, तालुका प्रमुख बबन राणे, नितीन मांजरेकर, गणेशप्रसाद गवस, शहर प्रमुख बाबू कुडतरकर, उप जिल्हा प्रमुख झेवियर फर्नांडीस यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी आमदार दीपक केसरकर यांनी वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देताना संजू परब यांच्यामध्ये एक चांगलं नेतृत्व आहे. त्यांचं वय त्यांच्या बाजूने असल्यामुळे त्यांना राजकारणात खूप मोठं भविष्य आहे. त्यांनी थोडा संयम ठेवल्यास ते खूप पुढे जातील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच आम. निलेश राणे म्हणाले, राजकारणात संजू परब म्हणजे माझा माणूस. मला विचारल्याशिवाय तो कोणताही मोठा निर्णय घेत नाही. त्याला कितीही ऑफर्स आल्या तरी तो सर्वात आधी मला फोन करतो. आमच्या दोघांचे जीवाभावाचे नाते आहे. तो माझा भाऊच आहे. राजकारणात निलेश राणेंचे नाव कधीही खाली पडू नये यासाठी संजू परबने स्वतः बदनाम होणे स्वीकारले. पण, निलेश राणेंची बदनामी कधी होऊ दिली नाही, असे सांगत श्री. राणे यांनी संजू परब यांची प्रशंसा केली. तसेच जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, सचिन वालावलकर, सुनिल राऊळ, सिताराम गावडे आदींनी त्यांना मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, मी जो काही आहे तो निलेश राणे यांच्यामुळेच आहे. मला आमदारकी मिळो वा न मिळो, पण निलेश राणे यांचा माझ्या डोक्यावरचा आशीर्वाद कायम राहावा हीच माझी इच्छा आहे. जिल्हाप्रमुख म्हणून आ. दीपक केसरकर यांच्या सोबत काम करताना वेगळीच उमेद मिळते. या दोन्ही नेत्यांनी मला जीवनात पुढे जाण्यासाठी आशीर्वाद दिले हे आशीर्वाद कायम राहावेत हीच इच्छा आहे, अशा शब्दांत शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी भावना व्यक्त केल्या.