....तर नगरपरिषदेवर काढू आक्रोश मोर्चा !

संजू परब यांचा इशारा ; पाणी प्रश्नी शिवसेना आक्रमक
Edited by: विनायक गावस
Published on: April 22, 2026 13:03 PM
views 142  views

सावंतवाडी : शहरात सध्या सुरू असलेल्या गॅस पाईपलाईन व नळ पाणी योजनेच्या कामामुळे काही भागातील जुन्या पाण्याच्या लाईन फुटल्या आहेत. ऐन उन्हाळ्यात लोकांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. पावसाळ्यात देखील हीच परिस्थिती राहणार असून ४ दिवसांत नळपाणी पाईपलाईन दुरुस्ती न केल्यास नागरिकांसह घागर घेऊन न.प.वर  आक्रोश मोर्चा काढू असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी दिला. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


ते म्हणाले, अनेक नागरिकांनी पाण्याच्या समस्येकडे लक्ष वेधून देखील कुठल्याही प्रकारे प्रशासन दखल घेतली नाही. नगराध्यक्षांनी याकडे लक्ष देण आवश्यक होत.‌मात्र, केवळ वेळ बदलून पाण्याची समस्या सुटणार नाही. आजची गंभीर परिस्थिती बघता पावसात देखील हीच परिस्थिती राहणार आहे. त्यामुळे ४ दिवसात दुरुस्ती होऊन लोकांना पाणी न मिळाल्यास नगरपालिकेवर मोर्चा काढू असा इशारा श्री. परब यांनी दिला आहे.


दरम्यान, काही प्रभागात चार-चार दिवस झाले पाणी येत नाही. काही भागात लोकांना गढूळ जंतूयुक्त पाणी येत आहे. यामुळे नागरिक त्रस्त झालेत आहेत. पाईपलाईन फुटल्याने हे प्रकार वाढत आहे. ५७ कोटीच्या नळपाणी योजनेच काम हे तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व्हावं अशी मागणी शिवसेनेने सभागृहात केली होती. मात्र, याकडे अद्यापही दुर्लक्ष केला जात आहे. वारंवार तक्रार करून देखील प्रशासन कोणतीही दखल घेत नाही. त्यामुळे महिलांना घागर घेऊन मोर्चा काढल्याशिवाय आता पर्याय नाही असं मत नगरसेविका ॲड. निता सावंत-कविटकर यांनी व्यक्त केले. यावेळी यावेळी  नगरसेवक बाबू कुडतरकर, अजय गोंदावळे, देव्या सुर्याजी, ॲड.सायली दुभाषी, शर्वरी धारगळकर, स्नेहा नाईक, क्लेटस फर्नांडिस, अर्चित पोकळे आदी उपस्थित होते.