
सावंतवाडी : शिक्षकांच्या प्रयत्नांमुळे आज शाळेचा पहिला नंबर आला. यासाठी सर्व शिक्षकांचे मनापासून अभिनंदन करतो, असे उद्गार शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी काढले. येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, चराठा नंबर १ चा पीएमसी मधून बेस्ट शाळा म्हणून पहिला क्रमांक आल्याबद्दल श्री. परब यांनी शिक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन तसेच मुलांना खाऊ वाटप करून अभिनंदन केले.
यावेळी परब बोलताना म्हणाले, शाळेला जी काही मदत लागेल ती आपण निश्चितच करू, शिक्षकांनी आपल्याला अनेक शाळेबाबत व्यथा सांगितल्यात. तसेच शाळेच्या बाहेरील संरक्षण भिंत देखील धोक्यात आहे. ती देखील कुठल्या माध्यमातून निधी देता येईल का ? त्यासाठी आपण प्रयत्न करू न झाल्यास आपण स्वखर्चाने ती भिंत बांधून देऊ असे आश्वासन देखील श्री. परब यांनी दिले. यावेळी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष उमेश परब, सरपंच प्रचिती कुबल मुख्याध्यापिका पेडणेकर, कुंभार, बाळू वाळके, राजू कुबल, क्लेटस फर्नांडिस आदी उपस्थित होते.