
सावंतवाडी : राजकीय परिस्थिती काही असो, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून मी निवडणूक लढणारच अशी जाहीर घोषणा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष व सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली.
स्वर्गीय शिवराम राजे भोसले, जयानंद मठकर या थोर व्यक्तींचा प्रभाव असलेल्या हा मतदारसंघ आहे. मात्र जिल्ह्याबाहेरील अतृप्त माणसांनी या मतदारसंघाचा खेळ मांडला आहे. बाहेरुन आलेली व ज्यांनी या मतदारसंघात कोणतेही काम केले नाही अशी माणसे येथे उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्नात आहेत. येथील स्थानिक लोक त्यांना विकाऊ वाटतात काय? असा सवाल संजू परब यांनी केला.
तसेच मळगाव ग्रामपंचायत सरपंचांविरोधात अविश्वास ठराव आणले जात आहेत. वार करुन महायुतीत दोस्ती होत नाही. मी व माझे सहकारी लवकरच भाजपच्या वरिष्ठांना भेटून हा मतदार संघ भाजपलाच मिळावा अशी मागणी करणार आहोत. असे श्री. परब म्हणाले. यावेळी विनोद सावंत उपस्थित होते.