
सावंतवाडी : मिलाग्रीस हायस्कूलचा विद्यार्थी विराज नंदकिशोर राऊळ यांने रेखाटलेलं माजी नगराध्यक्ष तथा शिवसेनेचे जिल्हा संघटक संजू परब यांचे पेन्सिल पोर्ट्रेट स्केच सावंतवाडी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी त्यांना देऊन अनोखी भेट दिली.
विराज राऊळ या विद्यार्थ्याने आपली काढलेली हुबेहूब पेन्सिल पोर्ट्रेट स्केच पाहून संजू परब बेहद्द खुश झाले. यावेळी उपस्थित माजी शालेय शिक्षण मंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर, कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्यासह संजू परब व इतर मान्यवरांनी विराज राऊळ याच्या या पेन्सिल पोर्ट्रेट स्केच कलेचे कौतुक करीत शाबासकीची थाप दिली. विराज राऊळ याला पेन्सिल पोर्ट्रेट स्केचची आवड असून त्याने छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, माजी शालेय शिक्षण मंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर यांच्यासह अनेकांची हुबेहूब पेन्सिल पोर्ट्रेट स्केच काढून अनेकांची वाहवा मिळवली आहे. विराज राऊळ याला सावंतवाडीतील अस्मसा आर्ट अकॅडमीचे सत्यम मल्हार आणि चित्रकार अक्षय सावंत तसेच मिलाग्रीस हायस्कूलचे कला शिक्षक गणेश डिचोलकर यांचे मार्गदर्शन लाभले.
विराज राऊळ याने शासकिय रेखाकला एलिमेंटरी परीक्षेत ए ग्रेड पटकावली असून त्याने सप्टेंबर २०२४ मध्ये इंटरमिजिएट परीक्षा दिली आहे. तसेच फेब्रुवारी २०२४ मध्ये इयत्ता ८ वी साठी घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत त्याने शहरी सर्वसाधारण गुणवत्ता यादीत जिल्ह्यात ११ वा तर सावंतवाडी तालुक्यात ५ वा क्रमांक पटकावित शिष्यवृत्ती प्राप्त केली. विराज राऊळ हा ओटवणे हायस्कूलचे सहाय्यक शिक्षक नंदकिशोर राऊळ यांचा मुलगा तर शिवसेनेचे माजगाव विभाग प्रमुख उमेश गावकर यांचा भाचा आहे.