सानिका गावडे, सार्था गवाणकर - हर्षद मेस्त्री "राधाकृष्ण चषक २०२४" चे मानकरी

Edited by: दिपेश परब
Published on: May 26, 2024 13:33 PM
views 461  views

वेंगुर्ला : आपल्या भारतीय संस्कृतीचा सांस्कृतिक ठेवा म्हणजे आपले अभिजात शास्त्रीय संगीत. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताने जागतिक पटलावर आपला ठसा उमटविला आहे. आपल्या जिल्ह्यातही या शास्त्रीय संगीताचा प्रचार व प्रसार व्हावा, शास्त्रीय संगीत शिकणाऱ्या जिल्ह्यातील युवा साधकांना हक्काचं व्यासपीठ मिळावं, त्यांची कला रसिकांसमोर आणुन त्यांच्या कलागुणांना न्याय द्यावा व त्यांना प्रोत्साहित करावं या उद्देशाने 'श्री राधाकृष्ण संगीत साधना सिंधुदुर्ग' व 'स्वयंभू कला क्रीडा मंडळ आजगांव' यांच्या संयुक्त विद्यमाने "राधाकृष्ण चषक २०२४" या सांगीतिक महोत्सवाचे आयोजन श्री देव वेतोबा मंदिर सभागृह आजगाव येथे करण्यात आले होते. या अंतर्गत 'शास्त्रीय गायन(हिंदुस्तानी ख्याल) स्पर्धा' व 'सवेष साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धा' घेण्यात आली.

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी गुरुवार २३ मे रोजी सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्हा मर्यादीत ʼशास्त्रीय गायन(हिंदुस्थानी ख्याल) स्पर्धाʼ संपन्न झाली. कार्यक्रमाचे उद्घाटन मुंबई येथील आंतरराष्ट्रीय किर्तीच्या जयपूर अत्रौली घराण्याच्या विख्यात शास्त्रीय गायिका विदुषी श्रृतीताई सडोलीकर, राधाकृष्णा संगीत साधनाच्या अध्यक्षा संगीत अलंकार वीणा दळवी, वेतोबा देवस्थानचे मानकरी श्री दादा प्रभूआजगांवकर, संजय पिळणकर, दशावतर कलावंत नारायण आसयेकर आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. या 'शास्त्रीय गायन (हिंदुस्तानी ख्याल)' विभागात सावंतवाडीच्या सानिका संजय गावडे 'राधाकृष्ण चषक'ची मानकरी ठरली. रत्नागिरीच्या तन्वी मंगेश मोरे हिने द्वितीय पारितोषिक, रत्नागिरीच्या सार्था नरेंद्र गवाणकर हिने तृतीय पारितोषिक, सावंतवाडीची विधिता वैभव केंकरे हिने उत्तेजनार्थ प्रथम तर नाधवडे, वैभववाडीचा हर्ष संजय नकाशे याने उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक पटकावले. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा अर्चना फाऊंडेशनच्या अध्यक्षा अर्चना घारे-परब, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते एकनाथ नारोजी, आणि देवस्थानचे मानकरी आणि परिक्षक महोदयांच्या हस्ते करण्यात आला.

या सांगीतिक महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवार दि. २४ मे रोजी सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्हा मर्यादित "सवेष साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धा" छोटा गट व मोठा गट अशी दोन गटात घेण्यात आली. स्वामी गगनगिरी महाराज आश्रम गगनगड कोल्हापूरचे विश्वस्त संजय पाटणकर, राजगड रिसाॅर्टचे मालक प्रमोद नाईक, मराठी पटकथा लेखक, चित्रपट दिग्दर्शक संतोष दाभोळकर आदी मान्यवरांच्या हस्ते श्रीं ची प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या सवेष नाट्यगीत गायन विभागात छोट्या गटातून रत्नागिरीची सार्था नरेंद्र गवाणकर 'राधाकृष्ण चषक' ची मानकरी ठरली. खारेपाटणच्या प्राजक्ता अभय ठाकूर-देसाई हिने द्वितीय, आजगावच्या आराध्य आनंद खोत याने तृतीय तर तुळस येथील ज्ञानेश्वरी प्रवीण तांडेल हिने उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले.

सवेष साभिनय नाट्यगीत' स्पर्धेत मोठ्या गटातून नेरूर कुडाळचा हर्षद प्रमोद मेस्त्री राधाकृष्ण चषकचा मानकरी ठरला . शिरोडा येथील कु. निधी श्रीकांत जोशी हिने द्वितीय पारितोषिक तर वेंगुर्ले येथील गीता सोपान गवंडे हिने तृतीय पारितोषिक तर रत्नागिरीच्या तन्वी मंगेश मोरे हिने उत्तेजनार्थ प्रथम व तळवडे सावंतवाडीच्या हेमंत हनुमंत गोडकर याने उत्तेजनार्थ द्वितीय पारितोषिक पटकावले. शास्त्रीय संगीतातील विख्यात गायिका विदुषी श्रुती सडोलीकर यांनी या स्पर्धेचं परीक्षण केलं.

या कार्यक्रमाचा पारितोषिक वितरण सोहळा परिक्षक विदुषी श्रुती सडोलीकर, भजनसम्राट भालचंद्र केळुसकर बुवा, अॅड. दिलीप ठाकुर, वीणा दळवी आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. स्पर्धेसाठी स्पर्धकांना संगीत साथ, हार्मोनियम साहिल घुबे, ऑर्गन भालचंद्र केळुसकर बुवा तर तबला साथ गोवा येथील आदित्य तारी, प्रसाद मेस्त्री यांनी केली. दोन्ही दिवसाच्या संपुर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय कात्रे यांनी केलं. श्री राधाकृष्ण संगीत साधनाचे सचिव हेमंत दळवी यांनी आभार मानले.